औरंगाबाद, दि. 23 - सेक्सवर्धक आणि गुडघे दुखीवरील आयुर्वेदिक औषधात अॅलोपॅथी रसायनाची भेसळ करून नागरिकांची फसवणूक करणा-या दोन राजस्थानी औषध निर्मिती कंपन्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आयुर्वेदिक असल्याचे सांगून जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी सिटीचौक ठाण्यात अन्न व औषधी प्रशासन विभागाने वेगवेगळे गुन्हे नोंदविले. या दुकानातून सुमारे ४० हजार रुपये किंमतीची औषधी जप्त करण्यात आली.
सारंग अविनाश जोशी(गुलमंडी), प्रेमपालसिंग धुना(रा. गंगानगर, राजस्थान)अशी गुन्हा नोंदविण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना सिटीचौक पोलिसांनी सांगितले की, अन्न व औषधी प्रशासन विभागाचे निरीक्षक माधव निमसे यांनी १४ सप्टेंबर २०१६ रोजी सुपारी हनुमान रोड येथील श्रीकृष्ण आयुर्वेदिक भांडार ३ एक्स गुटीका हे सेक्स वर्धक आयुर्वेद औषध आणि मे बिर्ला फार्मास्युटीकल्स कंपनीचे गुडगेदुखीवरील औषध म्हणून रुमावीन वटी विक्रीसाठी असल्याचे आढळून आले. या औषधाचे सॅम्पल त्यांनी जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. या दोन्ही सॅम्पलच्या तपासणीचा अहवाल प्रयोगशाळेकडून अन्न व औषधी प्रशासन विभागाला प्राप्त झाला. सेक्स वर्धक थ्री एक्स गुटिकामध्ये अॅलोपॅथीक सिल्डेनोफिल सायट्रेट हे घटक द्रव्याचे मिश्रण केलेले आढळले. तर रुमावीन वटी मध्ये निमेसुलाईड व डायक्लोफेनॉक सोडियम या अॅलोपॅथीक औषधाची मात्रा आढळली.
मान्यताप्राप्त औषध निर्माण कंपनीलाच अॅलोपॅथीच्या औषधी तयार करण्याचे अधिकार असल्याने निरीक्षक निमसे यांनी दुकानदार सारंग जोशी यांच्याकडे औषध कंपन्यांची माहिती विचारली. तेव्हा राजस्थानमधील गंगानगर येथील प्रेमपालसिंग धुना यांच्या कंपनीकडून सेक्स वर्धक गुटिका तर रुमावीन वटी ही संतोष कुमार बिर्ला, नवीनचंद्र बिर्ला(रा. गंगानगर, राजस्थान)यांच्याकडून मागविली असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही कंपंन्यांच्या संचालकांना तक्रारदार यांनी औषधी तयार करण्याचा परवाना सादर करण्याचे सांगितले असता दोन्ही कंपनीने त्यांना सदर औषधी त्यांच्या कंपनीची नसल्याचे दोन्ही तक्रारदार यांना कळविले. आरोपी हे कारवाई टाळण्यासाठी टोलवाटोलवी करीत असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. यात आठ महिन्याचा कालावधी उलटल्याने तक्रारदार यांनी अखेर २२ आॅगस्ट रोजी सिटीचौक ठाण्यात वेगवेगळ्या गुन्ह्याची नोंद केली. 40 हजाराची औषधी जप्त- निमसेऔषधी निरीक्षक माधव निमसे म्हणाले की, आरोपी कंपन्या आणि दुकानदार हे टोलवाटोलवी करीत असल्याचे लक्षात येताच आपण पोलिसांत तक्रार नोंदविली. आरोपीच्या दुकानातून सुमारे ४० हजाराची औषधी जप्त केली.