- मुजीब देवणीकर औरंगाबाद : देशभरात वाघांची घटणारी संख्या चिंता व चिंतनाचा विषय झालेला असताना, औरंगाबाद शहराने मात्र यात आशेचा किरण निर्माण केला आहे. वाघांचे प्रजनन व वंशवाढीसाठी औरंगाबादेत अत्यंत पोषक वातावरण आहे. मागील ३० वर्षांमध्ये औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातून तब्बल ४० वाघ देशभरातील प्राणिसंग्रहालयांना देण्यात आले. दोन दिवसांपूर्वी पुण्याला वाघाची एक जोडी दिली. गुजरातमधील गीर अभयारण्यामध्ये सिंहांची संख्या अशीच वेगाने वाढली. औरंगाबादेतही टायगर सफारी पार्क उभे करून वाघांची संख्या वाढविण्याचे नियोजन मनपाने केले आहे.
गर्भधारणेचा कालावधी १०० दिवसांचा औरंगाबादेत दोन महिने वाघाच्या जोडीला एकत्र ठेवले, तरी पाळणा हलतो. एका वेळेस दोन, तीन आणि जास्तीत-जास्त पाच बछडे देण्याची क्षमता वाघिणीमध्ये असते. औरंगाबादेत अशा पद्धतीने वाघिणींनी पिलांना अनेकदा जन्मही दिला आहे. वाघिणींच्या गर्भधारणेचा कालावधी ९० ते १०० दिवसांचा असतो.
प्राणिसंग्रहालयात आहेत ४ नर आणि ८ मादी सिद्धार्थ उद्यानात १९८२-८३ मध्ये प्राणिसंग्रहालय सुरू झाले. पंजाब येथून वाघाची जोडी सर्वप्रथम येथे आणली. या जोडीपासून तीन ते चार पिढ्यांची वंशवेल विस्तारली. अपुऱ्या जागेमुळे मध्यंतरी वाघांचा पाळणा काही वर्षे लांबविण्यात आला होता. आता जोड्या एकत्र ठेवण्यात येत आहेत. सध्या प्राणिसंग्रहालयात ४ नर आणि ८ मादी वाघ आहेत.
१०० एकरात टायगर सफारी पार्कऔरंगाबादेत प्रारंभी किमान १०० एकर जागेवर जागतिक दर्जाचे टायगर सफारी पार्क उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी, राज्य शासन यांच्या मदतीने हा प्रकल्प भविष्यात उभा राहणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रकल्पाचा आराखडा त्वरित पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात औरंगाबादेत वाघांची संख्या निश्चितच वाढणार आहे. आस्तिककुमार पाण्डेय, प्रशासक, महापालिका