आॅनलाईन भामटेगिरी: औरंगाबादेतील महिलेला १५ लाखांचा गंडा
औरंगाबाद : तुम्हाला लॉटरी लागली आहे, तुमचे एटीएम बंद करण्यात आले आहे, विदेशात मोठ्या पगाराची नोकरी लावतो, असे विविध प्रकारचे आॅनलाईन आमिष दाखवून आतापर्यंत अनेक जण गंडविल्या गेले आहेत; परंतु हे भामटे देशभरातील पोलिसांच्या काही हाती लागत नसत. औरंगाबाद पोलिसांनी मात्र, अशीच आॅनलाईन भामटेगिरी करणाऱ्या दोन नायजेरिन ठगांना मोठ्या शिताफीने दिल्लीत जाऊन अटक करण्याची किमया साध्य केली आहे. या भामट्यांनी औरंगाबादेतील एका उच्चशिक्षित महिलेला तब्बल १५ लाख रुपयांचा गंडा घातला होता. उजेह आॅगस्टीन उगो चिक्वू आणि चुक्वीक जॉर्ज (हल्ली मुक्काम दिल्ली) अशी नायजेरियन भामट्यांची नावे आहेत. या कारवाईबाबत माहिती देताना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, समर्थनगर येथील रहिवासी संपदा (नाव बदलले आहे) या ४८ वर्षीय महिलेचे फेसबुक अकाऊंट आहे. इंग्रजी साहित्य विषयात त्या डॉक्टरेट आहेत. फेसबुकवरील त्यांच्या अकाऊंटवरील त्यांचा मोबाईल नंबर मिळवून १५ एप्रिल रोजी त्यांना जेम्स ड्युक नावाच्या भामट्याने त्यांच्या व्हॉटस्अॅपवर संभाषण केले. त्यावेळी त्याने स्वत:ची मरीन टूर्स नावाची ट्रॅव्हल्स एजन्सी आणि वर्ल्ड क्लास वाईल्डलाईफ अॅण्ड ग्लेसिअर क्रुईसेस ही शिपिंग कंपनी असल्याचे सांगितले. या कंपनीला दिल्ली येथे कार्यालय सुरू करावयाचे आहे. त्यासाठी इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या महिलेची आम्हाला कार्यालय प्रमुख म्हणून नियुक्ती करावयाची असल्याचे सांगितले. संपदा यांनी तेथे नोकरी करण्याची तयारी दर्शविली. तेव्हा त्याने तुमच्या नावाने मलेशिया येथून एक पार्सल पाठवीत असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना मलेशिया येथून एका व्यक्तीने फोन करून सांगितले की, तुमच्या नावाने एक पार्सल पाठविण्यात आले आहे. त्या पार्सलमध्ये अडीच लाख अमेरिकन डॉलर, सोन्याची साखळी आणि अॅपल कंपनीचा मोबाईल आणि इतर गॅजेटस् असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर या भामट्याने पुन्हा त्यांना फोन करून एवढ्या मोठ्या प्रमाणात विदेशी चलन आणि सोन्याची साखळी आणण्यास परवानगी नाही. त्यामुळे कस्टम अधिकाऱ्यांनी हे पार्सल रोखून ठेवले आहे. हे पार्सल सोडविण्यासाठी पार्सलच्या एकूण किमतीच्या दहा टक्के रक्कम जमा करावी लागेल, असे २२ एप्रिल रोजी सांगितले. ही रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा करण्याचे त्याने सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून संपदा यांनी प्रथम अडीच लाख आणि साडेचार लाख रु पये भामट्याच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात जमा केले. त्यानंतर सुनीता शर्मा नावाच्या तोतया कस्टम अधिकाऱ्याने त्यांना फोन केला. तिने कस्टम क्लिअर झाल्याचे सांगितले.
मनी लॅण्डरिंग केसमध्ये अडकण्याची भीतीभामट्याने पुन्हा संपदा यांच्याशी संपर्क साधून मनी लॅण्डरिंगची केस तुमच्यावर होऊ शकते आणि यात तुम्हाला अटक होऊ शकते, अशा प्रकारची भीती दाखविली. या केसमधूून सुटका करून घेण्यासाठी पोलीस आणि कस्टम अधिकाऱ्यांचे तोंड बंद करण्यासाठी त्याने पंधरा लाखांची मागणी केली. अशा प्रकारची केस झाल्यास पोलीस आपल्यापर्यंत येतील, या भीतीपोटी संपदा यांनीही काही रक्कम नातेवाईकांकडून उसनी घेऊन भामट्याच्या आयसीआयसीआय या बँक खात्यात १५ आणि १६ जून रोजी अनुक्रमे २ लाख आणि ७ लाख रुपये जमा केले.
आणखी पंधरा लाखांची मागणी केल्यानंतर घेतली पोलिसांकडे धावभामट्याने पंधरा लाख रुपये उकळले. नंतर आणखी तेवढीच रक्कम मागितली. त्यानंतर संपदा यांनी १७ जून रोजी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. ही शुद्ध फसवणूक असल्याचे पोलीस आयुक्तांच्या लक्षात आले. त्यांनी प्रथम क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून घेऊन पोलीस निरीक्षक नागनाथ कोडे यांच्याकडे तपास सोपविला.
बँकेला पत्र देऊन गोठविले ७ लाखआयुक्तांच्या आदेशाने तातडीने क्रांतीचौक पोलिसांनी आयसीआयसीआय बँकेला पत्र पाठवून आरोपीच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आलेली रक्कम गोठविण्याचे कळविले. पण बँकेला हे आदेश मिळेपर्यंत भामट्याने आठ लाख रुपये काढून घेतले होते. पंधरा लाखांपैकी सात लाख रुपये पोलिसांच्या कारवाईमुळे वाचले.पोलिसांना दिल्लीला पाठविले विमानानेसायबर क्राईम सेलच्या मदतीने भामटे दिल्लीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांना पकडण्यासाठी क्रांतीचौक ठाण्याचे फौजदार सुनील कु रुंदकर आणि पोलीस जमादार कुलकर्णी यांना १९ जून रोजी तर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघ, जमादार दामले यांना २३ जून रोजी विमानाने दिल्लीला पाठविण्यात आले.
फौजदारासोबत झटापटदिल्लीतील छतरपूर भागातील हॉटेल्स होडल्स येथे नायजेरियन नागरिकांची २४ जूनच्या रात्री पार्टी होती. या पार्टीला दोन्ही भामटे उपस्थित असल्याचे फौजदार वाघ आणि कुरुंदकर यांना समजले. त्यानंतर त्यांनी दिल्ली पोलिसांचे एक पथक सोबत घेऊन आरोपींना पकडण्यासाठी हॉटेलबाहेर सापळा रचला. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दोन्ही भामटे हॉटेलमधून बाहेर पडले आणि रिक्षात बसले. त्यावेळी फौजदार वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर झडप घातली. यावेळी उजेह आॅगस्टीन हा पळून जाऊ लागला. वाघ यांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले. तेव्हा त्याने त्यांच्याशी झटापट केली. यावेळी वाघ यांनी त्यांच्याकडील पिस्तूल आरोपीच्या कानावर रोखले तेव्हा तो शांत झाला आणि चुक्वीक जॉर्ज याने पोलिसांचा रुद्रावतार पाहून शरणागती पत्करली.
आयुक्तांच्या बॅचमेंटने केली मदतपोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या बॅचचे आयपीएस अधिकारी रवींद्र यादव हे दिल्ली गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त आहेत. अमितेशकुमार यांनी त्यांना फोन करून या आरोपींना पकडण्यासाठी मदत करण्याचे सांगितले. त्यानंतर यादव यांनी आठ दिवस विशेष पथक औरंगाबाद पोलिसांच्या मदतीला दिले.
तपास पथकाला ५० हजारांचे बक्षीसनायजेरियन तरुणांना पकडण्याची उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पो. नि. नागनाथ कोडे, सायबर सेलचे सपोनि. गजानन कल्याणकर, उन्मेष थिटे, फौजदार नितीन आंधळे, हेमंत तोडकर, अनिल वाघ, अनिल कुरुंदकर आणि कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपयांचे बक्षीस आयुक्तांनी जाहीर केले.