ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. २१ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु तथा भगवतगीतेचे गाढे अभ्यासक डॉ. भगतसिंह हणुमंतराव राजूरकर (८२) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. कुटुंबियांनी त्यांच्या इच्छेनुसार मरणोत्तर नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जून १९६८ मध्ये हिंदी विभागाची स्थापना झाली. या विभागाचे ते संस्थापक विभागप्रमुख होते. हरियाणातील कांगडी गुरुकुल येथे त्यांनी संस्कृतमधून शालेय शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एम.ए.(संस्कृत), तर हैदराबादच्या उस्मानीया विद्यापीठातून एम.ए.(हिंदी) या पदव्या प्राप्त केल्या. राजूरकर यांनी तेव्हाच्या मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी संपादन केली. ह्यरामकथा के पात्रों के चरित्र का तुलनात्मक अध्ययनह्ण या विषयावर त्यांनी शोधप्रबंध लिहिला होता. विद्यापीठातील हिंदी विभागात प्राध्यापक, विभागप्रमुख, प्रभारी कुलसचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
सुरूवातील मे व जून १९७८ मध्ये प्रभारी कुलगुरु म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर १ मे १९८५ ते ६ मार्च १९८८ दरम्यान ते पूर्णवेळ कुलगुरु म्हणून कार्यरत होते. जुलै १९९५ मध्ये ते विद्यापीठाच्या सेवेतून निवृत्त झाले. या काळात कवित्रय, रामकथा व तुलसीदास, नई कहानी यासह २० ग्रंथाचे लेखन त्यांनी केले. डॉ. भगतसिंह राजूरकर यांच्या पार्थिवावर सायंकाळी पुष्पनगरी स्मशानभुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी अनिता, मुलगा चैतन्य, मुलगी अस्मिता यासह नातवंडे असा परिवार आहे.
उद्या शोकसभाडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील हिंदी विभागात रविवारी डॉ. भगतसिंह राजूरकर यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. विद्यापीठातर्फे उद्या सोमवारी दुपारी ३ वाजता महात्मा फुले सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोकसभेस कुलगुरु डॉ.बी.ए. चोपडे यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.