मुंबई: विधानसभेत गुरूवारी औरंगाबादमधील कचऱ्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील वातावरण तापले. यावेळी विरोधकांनी कचऱ्यामुळे औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी महापालिका व पोलीस आयुक्तांना जबाबदार धरत त्यांना निलंबित करण्याची मागणी केली. ही मागणी मान्य झाल्याशिवाय सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला आहे. त्यामुळे आता भाजपा यावर काय भूमिका घेणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आज सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी लक्षवेधीद्वारे हा मुद्दा सभागृहात मांडला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली. शहरातील प्रत्येक प्रभागात त्या त्या परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी, असा पर्याय यावेळी अजितदादांनी सुचवला. तसेच कचराप्रश्नावरून झालेल्या आंदोलनाच्यावेळी पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेवरही त्यांनी टीका केली. आंदोलकांवर झालेला लाठीमार ही माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्त यांना पदावरून दूर करावे. पोलिसांनी घराच्या काचा फोडल्या.स्वतः पोलिस एकप्रकारे दंगल करत होते. याठिकाणी एकप्रकारे माणुसकीचाच कचरा झाला आहे. त्यामुळे दोन्ही अधिकाऱ्यांना रजेवर पाठवून निवृत्त न्यायधीशांच्यामार्फत चौकशी झाली पाहिजे, असे अजित पवार यांनी सांगितले.
विधानसभेत औरंगाबादचा कचराप्रश्न पेटला; विरोधकांनी कामकाज रोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 12:00 PM