ऑनलाईन लोकमत / राम शिनगारे
औरंगाबाद, दि. ११ : तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्र व्यापलेले असताना ग्रंथालये तरी मागे कशी राहतील? अधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रंथालयांनी कात टाकली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ग्रंथालयाने तर अत्याधुनिकतेमध्ये देशातील पहिल्या पाच ग्रंथालयांमध्ये स्थान मिळवले आहे. विद्यापीठ परिसरातुन विद्यार्थी, प्राध्यापकांसह कोणीही एका क्लिकवर ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या पुस्तकाचा शोध घेऊ शकतो. या तंत्रज्ञान वापराला नुकतीच सुरूवात झाली असल्याचे ग्रंथपाल डॉ.धर्मराज वीर यांनी सांगितले.
शैक्षणिक क्षेत्रात विद्यापीठांची श्रीमंती ही ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथ आणि त्या ग्रंथाचा संशोधनासाठी होणारा वापर यावर मोजली जाते. सध्या तंत्रज्ञानाच्या युगात ग्रंथालयांनी सुध्दा प्रगती साधत तत्पर सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यापीठाचे ग्रंथालय डिजिटल बनले आहे. सर्व पुस्तकांचे संगणकीकरण केले असून, यात दुर्मिळ ग्रंथांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने पीएच.डी. च्या संशोधनात होणारी चोरी टाळण्यासाठी शोधगंगावर सर्व शोधप्रबंध अपलोड करण्याचे आदेश दिलेले आहे. या आदेशाचे पालन करत ग्रंथालयाने विद्यापीठाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतची ५ हजार २६ शोधप्रबंध आॅनलाईन अपलोड केले आहेत. तर ‘सोल’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातुन ग्रंथालयातील ३ लाख ७९ हजार पुस्तकांची प्रकाशक, लेखक, विषय, ग्रंथाच्या नावावरून उपलब्धता पाहता येत होती. मात्र यात आता एक पाऊल पुढे पढले आहे. विद्यापीठाच्या वेबसाईटवर ‘केआरसी’ लिंकवर गेल्यास ‘ओपॅक’ची एक लिंक दिसते. ही लिंक विद्यापीठाच्या परिसारातुन ओपन होते. या लिंकवर जाऊन आपण ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या ग्रंथाचा शोध घेऊ शकतो. संबंधित ग्रंथ कोणी घेऊन गेलेले असेल ते ही समजते. ग्रंथालयात तो ग्रंथ कधी जमा होणार याची माहिती सूध्दा मिळते. यामुळे थेट ग्रंथालयात जाऊन शोध घेण्याची गरज उरली नसल्याचे डॉ. वीर यांनी स्पष्ट केले.
‘पेंटिग आॅफ अजिंठा केव्हज’चे डिजिटलायझेशनविद्यापीठाच्या ग्रंथालयाने १६५० ते १८०० या कालखंडातील ४५०० दुर्मिळ ग्रंथाचे डिजिटलायझेशन (संगणकीकरण) प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी तब्बल ३५ लाख रूपयांचा खर्च येत आहे. यात जगप्रसिध्द असलेल्या अजिंठा लेणीची पेंटीग काढलेल्या जॉन ग्रिफिज संपादित ‘पेंटिग आॅफ अजिंठा केव्हज’ या पुस्तकाचा समावेश आहे. या ग्रंथाच्या केवळ तीनच मुळ प्रत शिल्लक आहेत. त्यातील एक प्रत विद्यापीठाच्या गं्रथालयात आहे.
वेब युझरचा वाढता प्रतिसादगं्रथालयाच्या वापर जगभरातील कोणत्याही संशोधक किंवा प्राध्यापकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. यासाठी ग्रंथालयाने नाममात्र शुल्क आकारत सदस्य होण्याची मुभा उपलब्ध करून दिलेली आहे. सध्या या सुविधेचा विद्यापीठाशी संलग्न १३५ महाविद्यालये आणि ४ हजार खाजगी युझर लाभ घेत आहेत.
ग्रंथालयातील उपलब्धी आकडेवारीत :
शोधगंगावर पीएचडी शोधप्रबंध- ५०२६उपलब्ध पुस्तके- ३,७९,०००दुर्मिळ ग्रंथ(१६६० ते १८०० कालखंड)- ४५००वेब शोधनिबंध -५,७३,०००ग्रंथालयातील संगणक- २००सीडी/डिव्हीडी ग्रंथालय -५०२६डेटा बेस किंमत -२०० कोटी रूपयेसार्वजनिक युझर- ४०००