- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद, दि. 3 : २ एकर शेतात पिकातून महागणपती अवतरला आहे. २०० फूट बाय ४०० फूट उंचीची प्रतिमा पाहण्यासाठी आसपासच्या पंचक्रोशीतून गर्दी होत आहे. प्रतिमा एवढी भव्य आहे की, ती पाहण्यासाठी चक्क ड्रोनचा वापर करण्यात येत आहे.
शहरातील कुलस्वामिनी प्रतिष्ठाण गणेश मंडळाचे विलास कोरडे व अलका कोरडे या दाम्पत्यांनी खुलताबाद तालुक्यातील खीर्डी गावात २ एकर शेतात पिकातून भव्य प्रतिमा निर्माण केली आहे. यासाठी २५ किलो गहू, १० किलो मक्का, १० किलो ज्वारी, १० किलो हरभराची दोन महिन्यापूर्वी अशापद्धतीने पेरणी केली की आता पिक ३ फूटापेक्षा अधिक उंच झाल्यावर त्यास महागणपतीचा आकार प्राप्त झाला आहे. गणेशाचे डोळे, जानवे व हार तयार करण्यासाठी बेडशीट, घोंगडी, चादर, मल्चींग पेपर व फुले यांचा वापर करण्यात आला आहे.
यंदा खीर्डी परिसरात कमी पाऊस झाला पण येथील शेतीतळ्यात मागील वर्षीचे पाणीसाठवून ठेवले होते. त्या पाण्यावरच पिक खुलले. या महागणपतीच्या देखाव्यातून ‘ पाणी अडवा-पाणी जिरवा’, ‘शेततळी तयार करा, ‘ सर्वांनी एकत्र येऊन पाण्याचे योग्य ते नियोजन करावे,’ असा संदेश गावक-यांना देण्यात येत आहे. तसेच या मंडळाच्या वतीने खीर्डी ग्रामपंचायतला ‘ पाणी अडवा-पाणी जिरवा’ या योजनेसाठी ११ हजार रुपयांची देणगीही देण्यात आली आहे. देखाव्यासाठी किशोर हिवर्डे, रमेश हिवर्डे, राजु राठोड, वैभव कोरडे, कैलास खंदारे, चंद्रमणी जायभाये, संजय राठोड,अतुल सावजी, प्रल्हाद गायकवाड, भाऊसाहेब घुगे, सज्जु जहागिरदार, अतिक पठाण, शेख मजहर, राजु दौड,संतोष गायकवाड, अनिल गावंडे आदींनी परिश्रम घेतले.
शहरवासीयांना एलईडी स्क्रीनवर शेतातील गणेशाचे दर्शन कुलस्वामीनी प्रतिष्ठाण गणेश मंडळाच्या वतीने शहरवासीयांना या शेतातील महागणपतीचे दर्शन घडावे यासाठी सिडको एन-६ येथील कुलस्वामीनी मंगल कार्यालय येथे एलईडी स्क्रीन लावण्यात आली आहे. सायंकाळी ६ ते १० वाजेदरम्यान चित्रफित दाखविण्यात येणार आहे.