विजय सरवदे, औरंगाबादऔरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अंगणवाड्यांनी देशातील पहिले ‘आयएसओ’ मानांकन पटकावण्याचा मान मिळविल्यानंतर आता तब्बल २५० ग्रामपंचायतींची वाटचालदेखील ‘आयएसओ’ मानांकन मिळविण्याच्या दिशेने सुरू आहे. त्यादृष्टीने राबविलेला औरंगाबाद ‘पॅटर्न’ दिशादर्शक ठरत आहे.तत्कालीन विभागीय आयुक्त संजय जैस्वाल, तत्कालीन जिल्हाधिकारी विक्रमकुमार आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या कार्यकाळात वेरूळ - खुलताबाद रोडवरील अब्दीमंडी या ३ हजार लोकवस्तीच्या गावाने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार मिळविल्यानंतर गावातील तीन अंगणवाड्यांनी ‘आयएसओ’ मानांकन मिळविले. अंगणवाड्यांना मानांकन मिळविणारे देशातील हे पहिलेच गाव.जिल्ह्यातील ग्रामपंचायतीही ‘आयएसओ’ झाल्या पाहिजेत, असा विचार जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या मनात आला. ५ सप्टेंबर २०१४ रोजी बीडीओ, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी आणि सरपंचांची कार्यशाळा घेऊन त्यात यासंबंधीचा संकल्प करण्यात आला. जिल्ह्यात ८६१ ग्रामपंचायती आहेत. यापैकी आजघडीला २५४ ग्रामपंचायती ‘आयएसओ’ मानांकनासाठी प्रस्तावित असून, यातील ५४ ग्रामपंचायतींच्या यासंबंधीच्या तपासण्याही झाल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चौधरी यांनी ‘डीपीडीसी’समोर निधीचा प्रस्ताव ठेवला. जिल्हाधिकाऱ्यांनीही तब्बल १२ कोटींचा निधी मंजूर केला. ग्रामपंचायतींच्या इमारतींसाठी प्रत्येकी १० लाख रुपयांचा निधी वाटप केला. जिल्ह्यातील २५४पैकी १०० ते १५० ग्रामपंचायतींच्या इमारतींकडे पाहिले तर ‘कॉर्पोरेट’ कार्यालयासारखा त्यांचा लूक दिसतो.ग्रामपंचायतींच्या अद्ययावत इमारतींबरोबरच गरोदर महिलांसाठी ‘माहेरघर’, कार्यालयासमोर वृक्ष लागवड, गावात खेळाचे मैदान, स्वच्छ पाण्याचा प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन, ग्रंथालय, व्यायामशाळा, सार्वजनिक शौचालये, स्मशानभूमींचा विकास, अंगणवाड्या - शाळांमध्ये हात धुण्यासाठी वॉश बेसीन, संगणक आदींची व्यवस्था केली आहे. ग्रामपंचायतींना गेल्या वर्षी १८ कोटी रुपयांचे कर वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी तब्बल ९१ टक्के वसुली झाली. कर वसुलीतही त्या ग्रामपंचायती राज्यात अव्वल ठरल्या.
औरंगाबाद ‘पॅटर्न’ने दिली नवी दिशा
By admin | Published: September 21, 2015 12:57 AM