ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि.20 - दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने मार्च महिन्यात नऊ जेसीबी खरेदीसाठी निधी उपलब्ध करुन दिला. त्यानंतर दीड महिन्यात यातील चार जेसीबींची खरेदी होऊन त्या कार्यान्वीत झाल्या. उर्वरित पाच जेसीबींच्या खरेदीची प्रक्रिया मात्र जलसंपदा खात्याच्या यांत्रिकी विभागाकडून अजूनही सुरूच आहे. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे ही मशिनरी येऊनही जिल्ह्यात जलसंधारणाची कामे होऊ शकणार नाहीत. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून भिषण दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्हाभरात जलयुक्त शिवार अभियान राबविले गेले. या अभियानात जलसंधारणाची जास्तीत जास्त कामे करण्याच्या हेतूने जिल्हा नियोजन समितीने मार्च महिन्यात नऊ जेसीबी खरेदीचा निर्णय घेतला. त्यानुसार जलसंपदा खात्याच्या यांत्रिकी विभागाला आवश्यक निधीही उपलब्ध करुन दिला. पहिल्या टप्प्यात यांत्रिकी विभागाने एप्रिलअखेरीस चार जेसीबींची खरेदी केली. या जेसीबी लगेचच कार्यान्वीत झाल्या. परंतु उर्वरित पाच जेसीबींची खरेदी अजूनही झालेली नाही. आता उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाल्यामुळे जलयुक्तची कामे बंद झाली आहे. या पाच जेसीबींची मे महिन्यात खरेदी झाली असती तर त्याद्वारे जिल्ह्यात आणखी मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे होऊ शकली असती. मात्र यांत्रिकी विभागाच्या दिरंगाईमुळे जिल्ह्यास मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे आता पावसाळा सुरू झाल्यामुळे आगामी काही महिन्यात जिल्ह्यात जलसंधारणाची कामे करता येऊ शकणार नाहीत. त्यामुळे यांत्रिकी विभागाने आता या मशिनरीची खरेदी केली तरी ती तशीच पडून राहणार आहे.
दोनदा निविदा काढल्यापाच जेसीबींची खरेदी बाकी आहे. त्यासाठी पुणे येथील कार्यालयाकडून प्रक्रिया राबविण्यात आली. दोन वेळा निविदाही काढण्यात आल्या होता. मात्र काही कारणांमुळे ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. आता तिसऱ्यांदा निविदा काढली आहे. लवकरच या पाच जेसीबींची खरेदी होईल. -एम. एम. काकड, कार्यकारी अभियंता, यांत्रिकी विभाग