औरंगाबाद: गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करावे अशी मागणी लावून धरण्यात आली होती. त्याला अखेर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. शिवसेना मंत्र्यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर आणला होता. त्यानंतर कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामकरणास मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयावरुन एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच, त्यांनी सरकारवर खोचक शब्दात टीकाही केली.
'या नेत्यांवर थुंका...'या निर्णयानंतर माध्यमांशी संवाद साधताना जलील म्हणाले की, ''आजचा निर्णय अतिशय घाणेरड्या राजकारणासाठी घेण्यात आला आहे. आता शहरातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या फोटोवर चपलांचा हार घातला पाहिजे. राजकारणासाठी हे नेते अतिशय खालच्या पातळीवर आले. आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे दलाल नेते रस्त्यावर फिरताना दिसले, तर त्यांच्या अंगावर थुंका. यांनी अतिशय खालच्या पातळीचे राजकारण केले. सत्तेचा इतकाच मोह होता, तर सत्तेला चिटकून बसायला हवं होतं. आम्ही चपला मारू अशा नेत्यांना,'' अशी घणाघाती टीका जलील यांनी केली.
'आता येऊन दाखवा औरंगाबादमध्ये'यावेळी जलील यांनी देशातील प्रमुख नेत्यांवरही टीका केली. ''मला शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी, अशोक चव्हाण आणि मराठवाड्यातल्या सर्व नेत्यांना विचारायचंय, हा निर्णय घेतला जात होता, तेव्हा तोंडात लाडू टाकून बसला होतात का? आता येऊन दाखवा औरंगाबादला, मग दाखवू तुम्हाला. उद्धव ठाकरे आमच्या मनात तुमच्याबद्दल आदर होता, पण जायची वेळ आली तर नीट जायचं ना, असे घाणेरडे राजकारण करण्याची गरज नव्हती.''
संबंधित बातमी-'घाणेरड्या राजकारणासाठी संभाजी महाराजांच्या नावाचा वापर, उद्धव ठाकरे तुम्ही तर...'
'आम्ही लढत राहू'''राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नागरिकांसोबत गद्दारी केली आहे खुर्ची वाचवण्यासाठी हा त्यांचा खेळ असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांना लाज वाटत असेल तर त्यांनी आजच राजीनामे द्यावे. हा मुद्दा आता केंद्र सरकारकडे गेला आहे, केंद्र यावर निर्णय घेईल. तोपर्यंत आम्ही यासाठी लढत राहू, वेळ आल्यावर रस्त्यावरही उतरल्याशिवाय राहणार नाही. मी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या जनतेला आवाहन करतो की, त्यांनी शांतता राखावी. अजून सर्व मार्ग बंद झाले नाहीत, दुसऱ्या मार्गांचा वापर करू,'' असेही जलील म्हणाले.
'चंद्रकांत खैरेंनी डान्स करत बसावं'''औरंगाबादच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दलाल नेत्यांना माझे चॅलेंज आहे, तुमच्यात हिम्मत असेल तर आज शहरात फिरुन दाखवा. तुमच्यात हिम्मत नाही, तुम्ही फिरू शकत नाही. तुम्ही लोकांचा विश्वासघात केला आहे. काही महिन्यानंतर निवडणुका होतील, तेव्हा यांना उत्तर मिळेलच. तोपर्यंत मी शहरातील लोकांना आवाहन करतो की, या नेत्यांच्या फोटोंवर चपलांचा हार घाला आणि सोशल मीडियावर व्हायरल करा, याच लायकीचे आहेत हे नेते. चंद्रकांत खैरैंनी आता प्रोफेशनल डान्सर व्हावं, आता त्यांचे राजकारण राहिले नाही. गेल्या पंचवीस वर्षांपासून चंद्रकांत खैरे याच मुद्द्यावरुन निवडून यायचे, आता हा मुद्दा पार पडला आहे. त्यामुळे आता त्यांच्याकडे डान्स करण्याशिवाय काही काम उरले नाही,'' अशी टीकाही जलील यांनी केली.