औरंगाबाद- ११ आणि १२ मे रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी बुधवारी रात्री विशेष तपास पथकाने (एसआयटी) शिवसेना कार्यकर्ता लक्ष्मीनारायण बाखरिया ऊर्फ लच्छू पहिलवानला अटक केली. बुधवारी लच्छू पहिलवानला अटक केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पोलिसांचं लच्छू पहिलवानाबरोबरचं वागणं बदलल्याचा आरोप केला जातो आहे. औरंगाबाद हिंसाचारात मुख्य आरोपी असलेल्या लच्छू पहिलवानाला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप केला जात असल्याचं वृत्त आजतकने दिलं आहे. लच्छू पहिलवानाशी पोलीस काहीतरी खाजगीत बोलत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पोलीस व लच्छू पहिलवान या दोघांची मिलिभगत असल्याचा आरोप केला जातो आहे.
औरंगाबादमधील हिंसाचार भडकाविल्याचा आरोपही पोलिसांवर केला जातो आहे. दोन गटांकडून जाळपोळ सुरू असताना त्यामध्ये पोलिसांचाही सहभाग होता, हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला होता. जमावाकडून तोडफोड आणि जाळपोळ सुरू असताना त्यांच्यासोबत 10 पोलीस चालत होते, असं नऊ मिनिटांच्या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतं आहे. रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका इमारतीमधून हा व्हिडीओ चित्रित करण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे जमाव वाहनं पेटवून देत असताना पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं.
औरंगाबादमध्ये हिंसाचार भडकाविण्यात लच्छू पहिलवानाचा मोठा वाट आहे. लच्छू या दंगलीचा मुख्य सूत्रधार आहे. लच्छू पहिलवान दंगलीत सक्रिय होता, असा संशय पोलिसांना होता. चार दिवसांपासून एसआयटी त्याच्याविरोधात पुरावे गोळा करीत होते. दोन दिवसांपासून मात्र तो पसार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत असताना बुधवारी रात्री तो दिवाणदेवडी येथील त्याच्या एका मित्राच्या घरी येणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना दिली. आयुक्तांच्या आदेशाने एसआयटीतील पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले, कर्मचारी मनोज उईके, दादासाहेब झारगड, सचिन संकपाळ, विनोद खरात आणि योगेश तळवंदे यांच्या पथकाने सापळा रचला. तो तेथे येताच दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लच्छूला चोहोबाजूने घेरून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सिटीचौक पोलीस ठाण्यात नेले. त्याला दंगल करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांनी दिली.