चिकलठाणा शिवारात बंद कारखान्यात केमिकल स्फोटात महिला ठारऔरंगाबाद: चिकलठाणा शिवारातील नवपूते वस्ती येथे फायबर दरवाजे आणि कुलरच्या बंद पडलेल्या कारखान्यात केमिकलच्या कॅनीच्या भीषण स्फोट झाला.या स्फोटात कारखान्याची मालकीन असलेली महिला जागीच ठार झाली. हा स्फोट एवढा भीषण होता की, मृत महिलेल्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या आणि रक्त-मांसाचे तुकडे संपूर्ण वर्कशॉपमध्ये उडाले. ही घटना गुरूवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास घडली.
मीरा ज्ञानेश्वर रुद्राके(४६,रा. नवपूते वस्ती,चिकलठाणा शिवार)असे मृत महिलेचे नाव आहे. प्राप्त माहिती अशी की, मृत महिला ही पती, मुलगा अविनाश आणि अक्षय, मुलगी सायली आणि सुन मनीषा यांच्यासह नवपूते वस्ती येथे राहतात . १८०० चौरस फुट क्षेत्रफळाचा त्यांचा तेथे भूखंड आहे. यापैकी सहाशे चौरस फुटावर त्यांचे पत्र्याचे घर तर बाराशे चौरस फुटावर कुलर आणि फायबर दरवाजे बनविण्याचा कारखाना होता. २००६ ते २०१२ पर्यंत त्यांचा हा कारखाना सुरू होता. त्यानंतर त्यांनी हा कारखाना बंद करून वेल्डींग वर्कशॉप सुरू केले आहे. हे वर्कशॉप बीड बायपास परिसरातील माऊलीनगर येथे आहे.
बंद पडलेल्या कारखान्याशेजारीच त्यांनी बांधलेल्या घरात रूद्राके कुटुंब अडिच म६िन्यापूर्वी राहण्यास गेले आहे. राखी पौर्णिमा असल्यामुळे त्यांचा पती ज्ञानेश्वर आणि मुलगा अविनाश हे मोटारसायकलने सकाळी ९ वाजेच्या सुमारास नेवासा (जि.अहमदनगर) येथे राहणाऱ्या चुलतबहिणीकडे जात होते. त्यामुळे घरी मीरा, मोठा मुलगा अक्षय, मुलगी सायली आणि सून मनीषा होते.आज सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास मीरा या चोहोबाजूने लोखंडी पत्रे लावलेल्या जून्या कारखान्यात काहीतरी काम करण्यासाठी गेल्या.
तेथे केमिकल्सच्या दहा ते पंधरा रिकाम्या कॅन्स,लोखंडी भंगार, जुने कुलर पडलेले होते. तेथे त्या काहीतरी करीत असताना अचानक मोठा स्फोट झाला.या स्फोटात मीरा बाईच्या शरीराचा चेहऱ्यासह शरीराच्या समोरच्या भागाच्या चिंधड्या उडाल्या. हा स्फोट एवढा भीषण होता की, त्या घटनास्थळीच ठार झाल्या. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी सिडको पोलीस, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल झाले.स्फोटाच्या आवाजाने दणाणला दोन किलोमिटरचा परिसरहा स्फोट एवढा भीषण होता की, स्फोटाचा आवाज परिसरातील दोन ते अडिच किलोमिटरपर्यंत गेला होता. अचानक झालेल्या या मोठ्या आवाजाने परिसरातील दणाणला. काय झाले अशी चर्चा नागरीक करीत होते. शेजारील आतल्या खोलीत असलेले त्यांचा मुलगा,सून आणि मुलगी हे धावतच कारखान्याकडे गेले. तेव्हा सुन्न करणारे चित्र पाहून त्यांना चक्करच आली.मीरा यांच्या चेहऱ्यासह संपूर्ण शरीराच्या चिंधड्या होऊन त्या कोसळलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी प्रवासात असलेल्या वडिल आणि भावाला अक्षयने फोन करुन बोलावून घेतले.