ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 28 : शिवसेनेच्या लोहगाव येथील जि.प.सदस्या सुरेखा जाधव यांनी जि.प.सदस्यत्व व शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा बुधवारी राजीनामा दिला. सेनेच्या मुखपत्रातील व्यंगचित्रावरून एक स्त्री म्हणून भावना दुखावल्याचा, शिवाय समाजभावनेचा आदर करीत थेट मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अर्दड यांच्याकडे सदस्यत्वाचा आणि जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांच्याकडे सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा सादर केल्याचे जाधव यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. शिवसेनेला व्यंगचित्राचा पहिला दणका जिल्ह्यातून बसला आहे. जि.प.निवडणुका सहा महिन्यांवर आल्याने थेट राजीनामा देण्यात राजकारण नसून समाजभावनेचा विचार केल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. महिला म्हणून दु:ख वाटले.
पक्षाला त्रास देण्याचा कोणताही उद्देश नाही. समाज भावनेमुळेच राजीनामा दिल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्रात निघणाऱ्या मूक मोर्चाबद्दल सेनेच्या मुखपत्रात महिलांची एका व्यंगचित्राद्वारे चेष्टा करण्यात आली. त्यामुळे त्यांनी पक्षाच्या जिल्हाप्रमुखांकडे जि.प.सदस्यत्वाचा व शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडेही राजीनामा दिला आहे. २०१२ मध्ये झालेल्या जि.प.सार्वत्रिक निवडणुकीत जाधव यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता.
माजी तालुकाप्रमुख विजय जाधव व लोहगाव जि.प.सदस्या सुरेखा विजय जाधव या पंधरा ते वीस वर्षांपासून शिवसेनेच्या विविध पदांवर कार्यरत होते. जाधव हे सेनेचे तालुकाप्रमुख होते. त्यांना त्या पदावरून काढण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्या मनपात खदखद होतीच. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले, माझ्यापर्यंत त्यांचा राजीनामा आलेला नाही. त्यामुळे त्याबाबत मला जास्त माहिती देता येणार नाही. सोशल मीडियात धुमाकूळशिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या ह्यत्याह्ण व्यंगचित्रामुळे राज्यात उठलेले वादळ शमल्याचा दावा सेना नेत्यांकडून होत असला तरी दोन दिवसांपासून सोशल मीडियामध्ये त्यावरून धुमाकूळ सुरू आहे. मराठवाड्यातील राजकारण तापले असून शिवसेना आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे एसएमएस सोशल मीडियामध्ये फिरत आहेत. शिवसेना आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले तरच समाज त्यांच्या सोबत राहील. अशा आशयाच्या एसएमएसचा सर्वाधिक भरणा सोशल मीडियामध्ये होता. तसेच खा.प्रताप जाधव, आ.संजय रायमुलक र, आ.शशिकांत खेडकर यांनी दिलेल्या राजीनाम्यावरून त्यांचे आभार मानणाऱ्या एसएमएसची संख्या मोठी आहे.