Aurangzeb Tomb RSS Nagpur Violence News: औरंगजेब कबरीवरून महाराष्ट्रात वादविवाद सुरू आहेत. नागपूरमध्ये याच मुद्द्यावरून वाद वाढला आणि हिंसेचा भडका उडाला. नागपूरमध्ये झालेली दंगल आणि औरंगजेब मुद्दा याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका काय? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित केला जात होता. अखेर संघाने यावर स्पष्ट भूमिका मांडतांना हा औरंगजेब आजच्या घडीला सुसंगत नाहीये, असे म्हटले आहे.
बंगळुरूमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा होत आहे. २१ ते २३ मार्च दरम्यान होत आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ही सभा होत आहे. यासंदर्भात माहिती देण्यासाठी संघाची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांना महाराष्ट्रात गाजत असलेला औरंगजेब मुद्दा आणि हिंसाचाराबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
संघ मुख्यालयापासून काही अंतरावर हिंसाचार झाला आहे. तर आजच्या घडीला औरंगजेब सुसंगत आहे का? महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही म्हणाले आहेत की हा हल्ला पूर्वनियोजित होता. विश्व हिंदू परिषदेने आंदोलन केले, त्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवकाची भूमिका काय आहे? असा प्रश्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील अंबेकर यांना विचारण्यात आला.
औरंगजेब, नागपूर हिंसाचार; आरएसएसची भूमिका काय?
सुनील अंबेकर म्हणाले, "बघा, कोणत्याही प्रकारचा हिंसाचार हा समाज स्वास्थासाठी चांगला नाहीये. मला वाटतं की, पोलिसांकडून याची दखल घेतली जात आहे. ते याच्या मूळाशी जातील. औरंगजेब सध्याच्या स्थितीशी सुसंगत नाहीये", असे उत्तर अंबेकर यांनी दिले.
आरएसएसच्या भूमिकेबद्दल विहिंपची भूमिका काय?
विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी गोविंद शेंडे म्हणाले, "औरंगजेब सुसंगत विषय नाही, हे संघाने म्हटलेलं आम्हाला मान्य आहे. पण, औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे आणि त्याचे समर्थन करणे, हे आम्हाला मान्य नाहीये. त्याला आदर्श ठेवणं आम्हाला मान्य नाही."
"आमचं आंदोलन १७ तारखेला होतं. ते संपलेलं आहे. आम्ही पुढची योजना आहे. हे ठरवण्यासाठी भरपूर वेळ आहे. ते ठरल्यानंतर आम्ही सरकारला सांगू", असे गोविंद शेंडे यांनी सांगितले.