"औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे केली’’, काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:02 IST2025-03-25T15:01:57+5:302025-03-25T15:02:16+5:30
Hussain Dalwai News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबाबत धक्कादायक दावा केला आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे केली होती, असा दावा हुसेन दलवाई यांनी केला आहे.

"औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे केली’’, काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचा दावा
मागच्या महिन्यात प्रदर्शित झालेल्या छावा या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेलं बलिदान, तसेच कैदेत असताना मुघल बादशाह औरंगजेबाने त्यांचा केलेला छळ यांचं दाहक चित्रिकरण करण्यात आलं होतं. तेव्हापासून देशभरात औरंगजेबाविरोधात संतापाची भावना दिसून येत असून, औरंगजेबाची खुतलाबाद येथे असलेली कबर हटवण्याची मागणी करण्यात येत आहे. या निमित्ताने इतिहासाचीही नव्याने घुसळण होत असून, दररोज नवनवे दावे केले जात आहेत. त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येबाबत धक्कादायक दावा केला आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मनुस्मृतीप्रमाणे केली होती, असा दावा हुसेन दलवाई यांनी केला आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हुसेन दलवाई म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी जरा औरंगजेबाचाही इतिहासही वाचावा. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली ती क्रुरता होती. त्याच्या भावालाही त्याने मारलं. दारा शिकोहची ज्याप्रमाणे हत्या करण्यात आली त्याचप्रमाणे त्याने संभाजी महाराजांची हत्या केली. मात्र छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करताना त्यांची मनुस्मृतीप्रमाणे हत्या कशी करावी याबाबत पंडित लोकांनी सांगितलं, त्यानुसार मग औरंगजेबाने त्यांची हत्या केली, असा दावा हुसेन दलवाई यांनी केला. ही बाब देवेंद्र फडणवीस मान्य करतील का? असा सवालही हुसेन दलवाई यांनी उपस्थित केला. तुम्हाला वस्तुस्थिती अमान्य करून चालणार नाही, असा सल्लाही त्यांनी दिला.