छत्रपती संभाजीनगर – राज्यात मागील काही दिवसांपूर्वी औरंगजेबाचा फोटो स्टेटसला ठेवल्याने वाद पेटला होता. अहमदनगर, कोल्हापूरात काही भागात हिंसक आंदोलन झाले होते. याच आंदोलनावरून भाजपावर टीका करताना बीआरएस नेते कादीर मौलाना यांनी वादग्रस्त विधान केले आहे. औरंगजेब माझा आदर्श आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
मौलाना कादीर म्हणाले की, भाजपाकडे दिशाभूल करण्यासाठी खूप मुद्दे आहेत. निवडणुकीपूर्वी अनेक मुद्दे समोर आणतील. औरंगजेब असा बादशाह आहे ज्याने अखंड भारतावर ५२-५३ वर्ष हुकुमत केली. त्याचा फोटो स्टेटस ठेवल्याने औरंगजेबाची औलाद जन्माला आली असं म्हणणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कुणी रोखत नाही का? हिंदू बांधवांना कळायला हवे. अशाप्रकारे विधाने करून तुम्हाला काय दाखवून द्यायचं आहे तो गुन्हेगार आहे? गुंडा आहे, दाऊद आहे का असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच मी नक्कीच औरंगजेबाला आदर्श मानतो. हिंदुस्तानावर हुकुमत केली. अशी हुकुमत केली जेव्हा त्याचा शेवट आला तेव्हा खिशात दफन करण्याएवढेच पैसे होते असा बादशाह मी जगात कुठेही पाहिला नाही. सध्या सगळीकडे भ्रष्टाचार आहे. इथं खायचे धंदे आहेत असं विधान बीआरएस नेते कादीर मौलाना यांनी केले आहे.
प्रकाश आंबेडकरांनी दिली होती कबरीला भेट
काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली होती. या भेटीनंतर आंबेडकर म्हणाले होते की, औरंगजेबाच्या समाधीला मी भेट दिली. इथं ऐतिहासिक वास्तू आहे ती बघायला आलो आहे. औरंगजेब राज्यावर ५० वर्ष राज्य करून गेला ती तुम्ही मिटवणार आहात का? औरंगजेबाचे राज्य इथं आले का हे बाबासाहेबांनी सांगितलंय. जयचंद इथं आले होते. त्या जयचंदाला शिव्या घाला आणि औरंगजेबाला शिव्या का घालताय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.