‘औरंगजेब हिंदुद्वेष्टा नव्हता’, जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर शरद पवारांची सावध प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 06:26 PM2023-01-03T18:26:34+5:302023-01-03T18:26:43+5:30
Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक नेते जितेंद्र आव्हाड यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा नव्हता असं विधान केल्याने, त्यांच्यावरही टीका होऊ लागली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानावरून पेटलेला वाद अधिकच चिघळला आहे. त्यातच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी एक नेते जितेंद्र आव्हाड यांनी या वादावर प्रतिक्रिया देताना औरंगजेब हा हिंदुद्वेष्टा नव्हता असं विधान केल्याने, त्यांच्यावरही टीका होऊ लागली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी या संपूर्ण वादावर प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणण्याची गरज नाही, या अजित पवार यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांना काहीजण त्यांचे काम म्हणून स्वराज्यरक्षक म्हणून उल्लेख करत असतील तर त्याला माझी काही तक्रार नाही, असं विधान केलं आहे. यावेळी शरद पवार यांना जितेंद्र आव्हड यांनी केलेल्या विधानाबाबत विचारलं असता त्यांनी या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. जितेंद्र आव्हाड काय बोलले हे मी पाहिलेलं नाही. अजित पवार काय बोलले हे मी पाहिलं आहे. त्याच्यामुळे मी त्यावर बोललो, असं उत्तर त्यांनी दिलं.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आले तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचे मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचे मंदिरही फोडले असते. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आले. त्यानंतर पुढे काय झाले तो इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते. त्यांच्या या दाव्यानंतर भाजपा आणि शिंदे गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
दुसरीकडे अजित पवार यांनी केलेल्या विधानावर भूमिका स्पष्ट करताना शरद पवार यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीराजे यांना काहीजण त्यांचे काम म्हणून स्वराज्यरक्षक म्हणून उल्लेख करत असतील तर त्याला माझी काही तक्रार नाही. काही घटक आता धर्मवीर म्हणून उल्लेख करत असतील आणि फक्त ते धर्माच्या अँगलने विचार करत असतील तर त्यावर माझा काही आक्षेप नाही. त्या व्यक्तीचे ते मत आहे. हे मांडण्याचा त्याला अधिकार आहे. ज्याला धर्मवीर म्हणायच आहे त्यांनी धर्मवीर म्हणावे, ज्याला स्वराज्यरक्षक म्हणायचे आहे त्यांनी ते म्हणावं.