- युनूस नदाफ (पार्डी, जि.नांदेड)
अर्धापूर तालुका बागायती क्षेत्र असून, मोठ्या प्रमाणात पिके घेतली जातात. केळी, ऊस व हळदीला बाराही महिने पाण्याची गरज असते. त्यामुळे विहीर व बोअरवेलचा वापर करावा लागतो. सध्या आधुनिकतेचे जग आहे.पाण्याच्या बचतीसाठी ठिबक संचाचा वापर केला जातो. परिणामी, पिकांना भरपूर पाणी मिळते आणि पाण्याचीही बचत होते. मात्र, नेहमी वीज खंडित होणे, हा प्रकार सध्या वाढला आहे. विजेअभावी पिकेही वाळतात. भारनियमन सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिवस व रात्रीच्या वेळी अंधारात जाऊन वीज पंप चालू-बंद करावा लागतो. यासाठी बाजारात वेगवेगळ्या यंत्राची विक्री सुरू आहे. मात्र, मोटार पंप बंद करण्यासाठी यंत्राची निर्मिती कोणीही केली नाही.
हे यंत्र अर्धापूर येथील शेतकरी परवेज खतीब यांनी तयार केले असून, सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. यासाठी बाजारातून एकच वस्तू खरेदी करावी लागते ती म्हणजे एमसीबी. शेतकरी परवेज खतीब यांनी त्यांच्या शेतातील वीज मोटार पंपावर स्वयंचलित यंत्र बसविले आहे. जेव्हा मोटार पंप बंद करायची, त्यापातळीपर्यंत पाण्याची बाटली विहिरीमध्ये बुडविली जाते. विहिरीमधील पाणी बाटलीपर्यंत आले व बाटली पाण्याच्या वर आली की, मोटार पंप आपोआप बंद होतो. यासाठी एमसीबी, एक पाणी बॉटल, दोर आणि स्टार्टर लागते.
यंत्रासाठी स्टार्टरमधून येणाऱ्या दोन वायरला एमसीबी जोडून त्याच एमसीबीच्या बटनाला छिद्र पाडून त्यातून लांब दोरी बांधावी. दोरीच्या एका टोकाला पाणी बॉटल बांधून ती ७५ टक्के पाण्याने भरावी. यात २५ टक्के हवा राहते. विहिरीत पाणी कमी झाल्यास बॉटल तरंगते आणि मोटार आपोआप बंद होते.