ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. १८ - एस.टी.महामंडळाच्या ताफ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान,आरामदायक व्यवस्था असलेली स्कॅनिया बस दाखल झाली आहे. विशेष म्हणजे ही बस आॅटोमॅटिक गेअर असलेली आहे. त्यामुळे वारंवार गेअर बदलण्याच्या कटकटीपासून चालकांची सुटका होत आहे. शिवाय इंधन बचतीलाही यातून हातभार लागत आहे.खाजगी बससेवेला टक्कर देण्यासाठी एस.टी.महामंडळ आपली पारंपारिक ओळख पुसून आता आधुनिकतेकडे वाटचाल करीत आहे. एस.टी.महामंडळातर्फे लाल बस,एशियाड बस आणि काही मार्गांवर शिवनेरी (व्हाल्वो)बससेवा चालविली जाते. प्रवाशांच्या सुविधेसाठी लाल बस आणि एशियाड बसमध्ये कमालीचा बदल करण्यात आला आहे. नव्या लाल बसगाड्यांमधील आसन व्यवस्था अधिक आरामदायक केली जात आहे. तर एशियाड बसमध्ये पुशबॅक आसन व्यवस्था देण्यात येत आहे. वातानुकूलित प्रवासासाठी शिवनेरी बससेवा दिली जाते. आता अधिक आरामदायक प्रवासासाठी स्कॅनिया बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. पुणे-औरंगाबाद मार्गावर व्हॉल्वो बससह स्कॅनिया बसेसच्या माध्यमातून शिवनेरी बससेवा देण्यात येत आहे. स्कॅनिया बस बसेस आॅटोमॅटिक गेअरयुक्त आहेत. त्यामुळे वारंवार गेअर बदलण्याची,क्लच दाबण्याचा चालकांचा त्रास कमी झाला आहे. शिवाय वारंवार गेअर बदलणे, क्लच दाबण्यातून इंधनाचा वापर अधिक होतो. परंतु या बसगाड्यांच्या माध्यमातून इंधनाची बचत होईल. या बसमधील आरामदायक आसन व्यवस्था,सीसीटीव्ही कॅमेरा, प्रत्येक आसनाजवळ ध्वनी व्यवस्थासह अत्याधुनिक यंत्रणेने ही बस सज्ज आहे. त्यामुळे खाजगी वाहतूकदारांशी खऱ्या अर्थाने तोडीस तोड स्पर्धा सुरू केल्याचे दिसते.चालकांना खास प्रशिक्षणआजघडीला पुणे-औरंगाबाद मार्गावर स्कॅनियाची बससेवा सुरू आहे. औरंगाबाद विभागासाठी लवकरच दोन स्कॅनिया बसेस प्रात्प होणार आहेत. यासाठी विभागातील चालकांना पुणे येथे खास प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी चालक रवाना झाल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
एसटीच्या ताफ्यात आॅटोमॅटिक गेअरची 'स्कॅनिया' बस
By admin | Published: July 18, 2016 8:09 PM