- श्रीपाद भालचंद्र जोशी(ज्येष्ठ साहित्यिक)मराठी भाषा व्यवहार हा अद्यापही स्वायत्त साहित्य संस्था असोत की शासनाच्या संस्था, मंडळे असोत, त्यांनी तो भाषाकेंद्री व संस्कृतीकेंद्री न करता, साहित्यकेंद्री तेवढाच राखल्याने मराठी भाषा, भाषा व्यवहार, भाषा माध्यम, भाषेचा जीवनाच्या विविध उपयोजित क्षेत्रांमध्ये मराठीचा आग्रही वापर, भाषेच्या नावावर केवळ साहित्याचे शिक्षण नव्हे, तर भाषेचे वैज्ञानिक शिक्षण, भाषा विज्ञानाचा अवलंब, भाषांच्या बोलींची समृद्धता, विविध भाषिक रूपे, संस्कृतीशी भाषेचे अंतर्निहित नाते, संस्कृती अध्ययन, संस्कृती विज्ञान हे सारे प्रत्यक्षात भाषेचे असणारे, साहित्याचे नव्हे, विविध आयाम अद्यापही मराठी भाषिक समाजापर्यंत पोहोचलेलेच नाहीत.ही भाषिक, सांस्कृतिक निरक्षरता मोठी आहे. कारण ते पोहोचविण्याची जबाबदारी असणाऱ्या शासकीय, अशासकीय यंत्रणा, संस्था, शिक्षण संस्था, प्राध्यापक, प्रशासन, शिक्षण अधिकारी इ. हे सारेच घटक या संदर्भात सारखेच अक्षम, असमर्थ तरी आहेत किंवा पूर्णपणे उदासीन तरी आहेत.या क्षेत्रातील ज्या स्वायत्त संस्थात्मक यंत्रणा आहेत, त्यांना त्यांच्या स्वत:च्याच घटनांमध्ये वर्णिलेली मूळ कार्ये करण्याऐवजी, केवळ व्यासपीठीय, उत्सवी, पुरस्कारानुवर्ती, सोहळेबाज आणि तात्कालिक स्वरूपाचीच कार्ये करत राहणे म्हणजेच मराठी भाषेचे कार्य करणे वाटते. त्यांचे हे अज्ञान दूर सारले जाण्याची गरज आहे. मात्र, ते त्यांना दूर सारायचेच नाही. त्यातच त्यांना सुख आहे, अशी स्थिती आहे. त्यांच्यातील काही धुरिणांना तर केवळ साहित्य संमेलन भरवणे, हेच तेवढे मराठी भाषेचे एकमेव संस्थात्मक काम वाटते. बाकी त्यांच्या दृष्टीने सारी रद्दी असते.या संस्थात्मक यंत्रणा मुळात निर्माण झालेल्या आहेत, त्या मराठी भाषा, संस्कृती, केवळ साहित्य नव्हे, यांच्या अभिवृद्धीसाठी. मराठीमधील महत्त्वाचे, तसेच मौलिक मराठी लेखन, पुन: केवळ साहित्य नव्हे, यास उत्तेजन देणे, त्यासाठी आवश्यक सहकार्य करणे, मिळविणे, शास्त्रीय विषयांची परिभाषा, कोश, संस्कृती, भाषाशास्त्र, सृजन, निर्मितीविषयक शास्त्रे इ.विषयांवरील ग्रंथ लिहून घेणे, प्रसिद्ध करणे आदींसह मराठी भाषा विकासाच्या आणि प्रसाराच्या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करणे, मराठी भाषा बोलणाºया बृहत्समाजात अशा प्रश्नांविषयी जागृती करणे, अशा भाषाविषयक महत्त्वपूर्ण कार्यासाठी या संस्थात्मक स्वायत्त यंत्रणा निर्माण झालेल्या आहेत. याचे भान त्या त्या संस्थांच्या नेतृत्वाला, कार्यकारी मंडळालाच नसल्याने व त्यांना ते आणून देण्याची जबाबदारी घेणारा एखाद-दुसरा अपवाद सोडल्यास, जागृत सदस्य व मराठी भाषिक समाज अनुपस्थित असल्याने, मराठी भाषेच्या, भाषा म्हणून, माध्यम म्हणून, संस्कृती म्हणून चाललेल्या दुरवस्थेला हे सारेच मराठी शासनापेक्षाही अधिकच जबाबदार ठरतात.यांचीच भाषिक निरक्षरता दूर सारून त्यांचेच भाषिक प्रबोधन त्यांनीच अगोदर करून घेतल्याशिवाय अथवा ज्यांना ते करूनच घ्यायचे नाही, अशांना या यंत्रणांमधून दूर सारल्याशिवाय व या संस्थात्मक यंत्रणा ज्या कार्यासाठी निर्माण झालेल्या त्यासाठीच चालविल्याशिवाय, मराठी टिकविण्यासाठी दुसरे कोण काय करणार?या सर्व पार्श्वभूमीवर वर म्हटलेल्या संस्थांच्या बाहेरचे, गेल्या काही वर्षांत प्रस्तुत लेखकासारख्या व्यक्ती, वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे लोक समूह, गट, समूह माध्यमांवरील गट मराठीच्या संवर्धनासाठी काम करत आहेत. चळवळ त्यामुळेच समर्थपणे उभी झाली आहे. मराठी वृत्तपत्रांनीही ती उचलून धरली आहे. नाही म्हणायला, ज्या संस्थांकडून हे होणे अपेक्षित आहे, पण होत नाही, त्यापैकी एखाद-दुसºया संस्थेचाही लक्षणीय सहभाग यात वाढला आहे, पण तो संस्थात्मक कमी आणि त्या संस्थांना अलीकडे लाभलेल्या नेतृत्वाच्या व्यक्तिगत आकांक्षांचा अधिक आहे. मराठी टिकण्या, टिकविण्यासाठी मात्र तो पुरेसा नाही. तो वाढला पाहिजे. तो संस्थात्मक अधिक असायला हवा.
स्वायत्त संस्था भाषाकेंद्री होणे गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 2:03 AM