डोंबिवली : एकीकडे मनमानी कारभारामुळे शहरातील रिक्षाचालकांवर टीकेची झोड उठवण्यात येत असतानाच एका रिक्षाचालकाने प्रवाशाचे प्रवासादरम्यान रिक्षात राहिलेले दागिने, रोख रक्कम आणि मोबाइल, असा दोन लाखांचा ऐवज परत करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आहे. पश्चिमेकडील जग्यासी जैस्वाल असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव आहे. ते रिक्षाचालक-मालक युनियनचे सदस्य आहेत. ते पश्चिमेकडील दीनदयाळ मार्गावरील रिक्षा स्टॅण्डवर भाडे घेण्यासाठी उभे होेते. पूर्वा गडसे आणि त्यांचे पती विलास त्यांच्या रिक्षात बसले. त्या वेळी त्यांनी त्यांचे सामान आसनामागील भागात ठेवले. रिक्षातून उतरल्यानंतर भाडे आकारल्यावर जैस्वाल परत निघाले. पण, त्यानंतर रिक्षाची स्वच्छता करत असताना त्यांना एक पिशवी पाठीमागे दिसली. ती पाहिली असता त्यात दागिने आढळले. जैस्वाल यांनी तातडीने ही माहिती युनियनचे काम करणाऱ्या कैलास यादव यांना दिली. यादव यांनी ही माहिती युनियनचे अध्यक्ष शेखर जोशी यांच्या कानांवर घातली. काही वेळानंतर गडसे दाम्पत्याने युनियनचे कार्यालय गाठले. रिक्षात पिशवी सापडली का, अशी चौकशी त्यांनी तेथे केली. ओळख पटवून त्यांना त्यांचे दागिने परत केल्याचे जोशी म्हणाले. त्या पिशवीत एक लाख ८० हजारांचे दागिने, १० हजार रुपये रोख रक्कम, मोबाइल असा ऐवज होता. (प्रतिनिधी)
रिक्षाचालकाने दोन लाखांचे दागिने केले परत
By admin | Published: April 28, 2017 12:59 AM