सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी, अजित पवारांना विचारला प्रश्न; दादा म्हणाले....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 08:54 AM2024-03-06T08:54:07+5:302024-03-06T08:55:51+5:30
आम्ही वेगळे काही केले असा काही भाग नाही. आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी ठेऊन आम्ही भाजपासोबत जाऊ शकतो असं अजित पवारांनी सांगितले.
मुंबई - Ajit Pawar Interview ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकते. तत्पूर्वी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यात २०१९ नंतर बरीच राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. त्यात प्रामुख्याने पवार कुटुंबात अजित पवारांनी घेतलेल्या वेगळ्या भूमिकेमुळे वादळ उठले. शरद पवार, सुप्रिया सुळे एकाबाजूला आणि अजित पवार दुसऱ्या बाजूला असं चित्र सध्या बारामतीत आहे.
यातच गायक अवधूत गुप्ते यांनी अजित पवारांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत गुप्ते यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंबाबत प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार म्हणाले की, आज मी माझी राजकीय भूमिका घेतली. प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. घरगुती नातेसंबंध हे वेगळे आहेत. आमच्या घरात पहिल्यापासून पाहिले तर आमचे संपूर्ण घराणे शेतकरी कामगार पक्षाचे होते. वसंतदादा पवार हे शेकापचे मोठे नेते होते. कुटुंब शेकापचे काम करत होते. त्यावेळी एक व्यक्ती काँग्रेसचं काम करत होती. कारण त्यांना यशवंतराव चव्हाण आणि काँग्रेसची विचारधारा पटलेली होती असं अजित पवारांनी सांगितले. झी २४ तासवर ही मुलाखत घेण्यात आली.
तसेच कुटुंब शेकापचे काम करायचे तर शरद पवार हे काँग्रेसचे काम करत होते. आम्ही लहानपणापासून हे बघितले आहे. घरात प्रत्येकाला व्यक्तिगत आणि राजकीय स्वातंत्र्य आहे. मी वडिलधाऱ्यांचा आदर करत आलेलो आहे. यापुढेही करत राहणार आहे. ती आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. ती परंपरा आहे. पण आताच्या घडीला आम्ही ज्या मार्गाने चाललो आहोत. सर्व नेत्यांनी जो निर्णय घेतला त्याचे समर्थन करावे अशी आमची अपेक्षा होती. इतकी वर्ष आमचे प्रमुख काय सांगतील त्याचे समर्थन आम्ही करत होतो असंही अजित पवारांनी म्हटलं.
दरम्यान, जुन्या आठवणी काढल्या तर त्या त्या काळातील आहे. आताचा काळ पूर्ण बदललेला आहे. आम्ही वेगळे काही केले असा काही भाग नाही. आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी ठेऊन आम्ही भाजपासोबत जाऊ शकतो. जर शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर शिवसेना-भाजपा यांच्यात फारकाही फरक आहे असं नाही असा दावा अजित पवारांनी कार्यक्रमात केला आहे.