- नितीन कांबळे, आष्टी (जि.बीड)
निसर्गाची अवकृपा आणि प्रशासनाच्या उदासिनतेमुळे आष्टी तालुक्यातील मजुरांवर पुन्हा स्थलांतराची वेळ आली आहे. ऊसतोडीसाठी गेलेले कडा परिसरातील मजूर गावी आल्यानंतर आठ दिवस होत नाही तोच काहीही काम न मिळाल्याने त्यांना अहमदनगर येथे जाऊन काम शोधण्याची वेळ आली आहे. कारखान्याच्या गळीत हंगामात तालुक्यातून ६० हजार मजुरांचे स्थलांतर झाले होते. हंगाम पूर्ण झाल्याने १५ दिवसांपासून हे मजूर गावी परतू लागले आहेत. गावी परतूनही मजुरीचा प्रश्न कायम आहे. हाताला काम नसल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मजुरांना अहमदनगरमधील एमआयडीसी तसेच व्यापाऱ्यांकडे काम करण्याची वेळ आली आहे. प्रशासकीय स्तरावरील कामे प्रक्रियेत रखडली आहेत. तालुक्यात एम.आर.जी. एस अंतर्गत २२५ कामे सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहेत; मात्र मजुरांची संख्या पाहता कामांची संख्या अत्यल्प आहे. आष्टी तालुक्यात १२१ ग्रामपंचायती असून, तालुक्याची लोकसंख्या अडीच लाखाच्ंया घरात आहे. तब्बल सहा महिने ऊसतोडणीसाठी परराज्यात गेलेले मजूर परतले खरे, मात्र पुन्हा त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्यावर पुन्हा भटकंतीची वेळ आल्याचे नवनाथ झांजे यांनी सांगितले. तालुक्यात मजुरांची संख्या वाढली असून त्या तुलनेत कामांची संख्या मात्र अपुरी आहे. अधिकारी मात्र यंत्राद्वारेच कामे पूर्ण करण्यावर भर देत आहेत.दिवस उजाडताच आमच्या गावातून १०० ते १२५ मजूर नगरला जातात. गावात हताश होऊन बसण्यापेक्षा हाताला मिळेल ते काम आम्ही करीत आहोत. मजुरांची संख्या वाढल्याने दोनशे पन्नास रुपयांचा रोजगार २०० रुपयांवर आला आहे. - साहेबराव गरूड, मजूर, कडा (बीड)कारखान्यावर गेल्यावर कामाची तरी शाश्वती असते; मात्र गावात येऊन पुन्हा तोच प्रश्न समोर येत आहे. उपासमार काय असते हे आम्ही अनुभवायला लागलो आहोत. प्रशासनाने कामांसंदर्भात ठोस पावले उचलावीत, अन्यथा जगणे मुश्किल होणार आहे. - चंद्रकला कांबळे,महिला कामगार, घाटापिंप्रीतालुक्यातील विविध गावात २२५ कामे एम.आर.ए.जी.एस.अंतर्गत सुरू झाली आहेत. त्यावर २,९०० मजूर काम करीत आहेत. तसेच एप्रिल महिन्याच्या अखेरीस इतर ठिकाणीही कामे सुरू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला आहे. - रामेश्वर गोरे, तहसीलदार