लातूर : माणूस स्व-केंद्री झाल्याने दुसऱ्यांच्या सुख- दु:खात सहभागी होत नाही, याची प्रचिती बहुतांश मंडळींना येते. परंतु, लातुरातील महेबूब चाचा हे मुक्या पशू, पक्ष्यांसाठीच जगत आहेत. जखमेमुळे विव्हळत पडलेल्या जवळपास २०० पक्ष्यांवर त्यांनी उपचार करुन जीवनदान दिले आहे. पक्ष्यांसाठी मासिक ७ हजार रूपयांची ते पदरमोड करीत असल्याने त्यांच्या घरी किलबिलाटच असतो.
शहरातील मळवटी रोडवरील बुऱ्हाणनगरात राहणाऱ्या महेबूब इसाक सय्यद यांचे पत्र्याचे घर आहे. बालपणापासूनच ते पशू- पक्षांत रमायचे. आजघडीला त्यांच्या घरी हंस, ससे, चिनी कोंबड्या, कबुतरे, साळुंक्या, बुलबुल, चिमण्या, कावळे आदी पक्ष्यांची १०० पेक्षा जास्त घरे आहेत. त्यांचे घर हे ४० बाय ४० चौ. मी. चे असून पक्ष्यांसाठीच त्यांनी १५ बाय ४० चौ. मी. जागा खुली ठेवली आहे. त्यात त्यांनी विविध फळांच्या झाडांची लागवड केली आहे. पक्ष्यांसाठी घरात ५० पेक्षा जास्त पाण्याच्या कुंड्या, अन्नासाठी भांडी बांधले आहेत.
पशू, पक्ष्यांच्या पाण्यासाठी काढले कर्जपशूधनासाठी त्यांनी पाण्याचे हौद बांधले आहेत. परंतु, २०१४ मध्ये पाणीटंचाई जाणवू लागल्याने काही पशूधन पाण्याविना परतत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे त्यांनी ७० हजारांचे खाजगी कर्ज काढून बोअरवेल खोदली. सुदैवाने १८० फुटावर ४ इंच पाणी लागले आणि पाण्याची अडचण दूर झाली.