- सचिन भोसले
कोल्हापूर : जगातील सर्वाधिक मोठे दान म्हटले तर रक्तदान म्हणता येईल. त्यातही दुर्मीळ प्लेटलेट्स म्हणजे रक्तातील महत्त्वपूर्ण घटक होय. अनेक रुग्णांचे प्राण या घटकामुळे वाचतात. त्यामुळे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा महत्त्वपूर्ण प्लेटलेट्सचे १७० वेळा कोल्हापूरच्या विश्वजित काशीद (Vishwajit kashid) या २८ वर्षीय युवकाने दान केले आहे. त्यामुळे तो जगभरातील चौथा एबी निगेटिव्ह रक्तदाता व भारतातील पहिलाच रक्तदाता ठरला आहे. (Vishwajit kashid became india's first most frequent platelets donor.)
विश्वजित मूळचा कोल्हापुरातील प्रतिभानगरातील राहणारा. सध्या पुणे येथे संगणकीय अभियंता म्हणून कार्यरत आहे. त्याने २०१४ साली रक्तदान केले होते. त्यानंतर त्याला रक्तदानाऐवजी प्लेटलेट्सचे रुग्णांकरिताचे महत्त्व समजले. त्यानंतर आजतागायत त्याने १७० वेळा प्लेटलेट्स दान केल्या आहेत. त्याचा हा विक्रमच म्हणावा लागेल. त्याचा एबी निगेटिव्ह हा रक्तगट आहे. त्यात तो जगभरात प्लेटलेट्स दान करण्यात चौथ्या क्रमांकावर, तर भारतात पहिल्या क्रमांकाचा दाता आहे. त्याच्या कार्याची दखल घेत २०१८ साली केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध डॉ. रघू यांच्या हस्ते त्याचा ‘यंग मेडिकल सायंटिस्ट’ म्हणून गौरव केला. असा पुरस्कार मिळवणारा तो भारतातील पहिला अभियंता ठरला आहे. यापूर्वी असा मान पटकाविणारे सर्व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर होते. यामध्ये सर्वाधिक लोकांनी सहभागी व्हावे, याकरिता ब्लड बँक टूरिझम ही मोहीम सुरू केली आहे. त्याद्वारे युवक या मोहिमेत सहभागी होत आहेत. त्याने आतापर्यंत अमेरिका, युरोप, जर्मनी, इंग्लड आदी ठिकाणी प्लेटलेट्सबद्दल जनजागृती केली आहे. त्याचा तेथे या कार्याबद्दल गौरव केला आहे. त्याला याकामी प्रकाश घुंगुरकर व जीवनधारा ब्लड बँकेचे सहकार्य मोठे राहिले आहे.
प्लेटलेट्स महत्त्वाचा घटक
मानवी शरीरात दीड ते साडेचार लाख एवढ्या प्लेटलेट्स आढळतात. प्लेटलेटची संख्या वाढल्यास रक्ताची गुठळी होऊन रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. यातूनच हृदयरोग, स्ट्रोक यांसारखे आजार होतात. हाता-पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाहास अडथळा निर्माण झाल्यास तो भाग बधिर होऊन निकामी होण्याची शक्यता जास्त असते. प्लेटलेट्सची संख्या कमी झाल्यासदेखील रक्तस्त्राव अधिक प्रमाणात होतो, कारण त्याला रोखण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्लेटलेट उपलब्ध नसतात. रक्तदात्याकडून मिळालेल्या एक युनिट रक्ताचे विघटन केल्यास त्यातील एक अष्टमांश भाग प्लेटलेट्सचा असतो. प्लेटलेट्स साठविण्याचा कालवधी फक्त पाच दिवसांचा असल्याने प्लेटलेट डोनर महत्त्वपूर्ण ठरतात.
ब्लड बँक टूरिझमची संकल्पना
प्लेटलेट्सची माहिती सर्वांना व्हावी, याकरिता ब्लड बँक सहलीचे आयोजन केले जाते. या माध्यमातून ५० जणांची मोफत सहल काढली जाते. यात ब्लड बँकेत नेऊन ब्लड बँकेचे काम, प्लेटलेट्सची शास्त्रीय माहिती तसेच प्लेटलेट्स डोनेशनसाठी प्रबोधन केले जाते.
कोण होऊ शकतो दाता?
प्लेटलेट्स दान करणाऱ्या व्यक्तीच्या रक्तातील प्लेटलेट काऊंट चांगला असला पाहिजे. प्लेटलेट दाता होण्यासाठी किमान वजन ५५ किलो व रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण १२.५ असावे लागते. हाताच्या नसा जाड असाव्या लागतात. महिन्यातून दोन वेळा प्लेटलेट्स दान करता येते.
प्रत्येक तीन महिन्यांतून एकदा रक्तदान केले तर देशाला रक्ताची गरज भासणार नाही व रक्त वायाही जाणार नाही. त्यामुळे तीन महिन्यांची सायकल प्रत्येक नागरिकाने करणे आवश्यक आहे. ही पद्धत युरोपीय देशात सुरू आहे. त्यामुळे आपत्तीजनक परिस्थितीतही त्यांना रक्त पुरते. एकदा रक्तदान केल्यानंतर प्लेटलेट्सही दाता दान करू शकतो.
- विश्वजित काशीद