रत्नागिरी – ‘राजकारणाचा चिखल झालाय आता तरी साहेब एकत्र या’ असे पोस्टर्स राज्यातील विविध शहरात काही दिवसांपूर्वी झळकले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांनी एकत्र यावे असं आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर मनसे-ठाकरे गटाच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या. राज-उद्धव ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न सर्वांना पडला. परंतु त्यावर दोन्ही भावांनी भाष्य करणे टाळले. परंतु मनसे नेते अविनाश जाधव यांनी केलेल्या विधानामुळे मनसे-ठाकरे गटाची युती सहज सोप्पी नाही याची प्रचिती येते.
मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, मातोश्रीने जो राज ठाकरेंना त्रास दिलाय तो आम्ही कदापि विसरणार नाही. परंतु राज ठाकरेंनी जर उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत. जर साहेबांनी एकला चलोचा निर्णय घेतला तर आम्ही सगळेजण राज ठाकरेंच्या पाठिमागे खंबीर आहोत असं विधान त्यांनी केले आहे.
त्याचसोबत मुंबईतील आमचे ८० टक्के पदाधिकारी कोकणातले आहेत. मुंबईत मनसेला मानणारा खूप मोठा कोकणी माणसांचा वर्ग आहे. जो मुंबईत माणूस राहतो तो त्यांच्या गावातही काम करू शकतो. पुढील वर्षभरात कोकणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना मजबूत झालेली दिसेल. राज ठाकरे हे रत्नागिरी, चिपळूण दौऱ्यावर आहे. मनसेला काय मिळणार हे लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर लोक आताच्या राजकारणाला कंटाळले आहेत. लोक निवडणुकीची वाट बघतायेत. लोकांना या गोष्टीचा संताप आहे. त्यामुळे निवडणुकीत जनता यातून सगळ्यांना उत्तर देईल असंही मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं.
दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार किती करणार? शपथ होऊन १२ दिवस झाले तर खातेवाटप नाही. मंत्रिदालन, बंगले, वाहने भेटली. बिनखात्याचे मंत्री आहेत. कार्यालयात बसून काय काम करावे हे कुणाला माहिती नाही. हे सगळे दिशाभूल करणारे आहे. महाराष्ट्रातील जनता याला बळी पडणार नाही असेही अविनाश जाधव यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.