मुंबई : नरभक्षक अवनी (टी-१) वाघिणीला ठार मारल्यानंतर अनाथ झालेल्या तिच्या 11 महिन्यांच्या दोन बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने सात पथके तयार केली आहेत. या बछड्यांचा युद्धस्तरावर शोध घेण्यात येत आहे. मात्र, अवनी वाघिणीचे बछडेही नरभक्षक होण्याची शक्यता शार्पशूटर शआफत अली यांनी व्यक्त केली आहे.
ज्यावेळी अवनी वाघीण माणसांची शिकार करायची त्यावेळी तिच्यासोबत तिचे बछडेही होते. त्यामुळे अवनी वाघिणीचे बछडेही नरभक्षक होण्याची शक्यता आहे. बछडे सध्या 10 ते 11 महिन्यांचे आहेत. याच वयात त्यांची शिकारीची मानसिकता घडत असते. आईकडूनच बछडे शिकार करणे शिकतात. तसेच, बछड्यांनी माणसांना खाल्ल्याचे पुरावे आहेत, असा दावाही शार्पशूटर शआफत अली यांनी केला आहे.
दरम्यान, आई गेल्यामुळे बछडे सैरभैर झाले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून हे दोन्हीही बछडे उपाशी असल्याची शक्यता आहे. आणखी दोन-चार दिवसांत त्यांना काही खायला मिळाले नाही, तर भुकेपोटी त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. 11 महिन्यांचे बछडे हे केवळ बकरीचे लहान पिल्लू किंवा इतर दुसऱ्या लहान प्राण्याचीच शिकार करू शकतात, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
नाईलाजाने ठार केले‘अवनी’ वाघिणीला बेशुद्ध करून जिवंत पकडण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्याने वन कर्मचा-यांचा जीव वाचविण्यासाठी नाईलाजाने तिला ठार मारावे लागले. मंत्री आणि सचिव मुंबईत मंत्रालयात बसून वनांचे आणि वन्यजीवांचे रक्षण करत नाहीत. ते शेतकरी व अदिवासी करतात. त्यांच्यामध्ये खूप असंतोष होता. तो दूर केला नसता तर अखेरीस हेच लोक वन्यजीवांचे शत्रू झाले असते,असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.