प्राची सोनवणे,
नवी मुंबई- स्वातंत्र्यसैनिकांचे गाव अशी ओळख असलेल्या घणसोलीमधील गोकुळाष्टमी महोत्सवाला ११० वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्य लढ्यामध्ये जनजागृतीसाठी सुरू झालेल्या उत्सवाची परंपरा ग्रामस्थांनी प्राणपणाने जपली आहे. श्रावण कृष्ण प्रथमा ते गोकुळाष्टमीपर्यंत अखंड चोवीस तास मंदिरामध्ये अखंड नामस्मरण केले जात आहे. नवी मुंबईची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू झाली असली तरी हे शहर येथील मूळ भूमिपुत्रांच्या नावानेच ओळखले जाते. प्रत्येक गावातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी गावांची महापालिका झाली तरी जुनी परंपरा, सण व उत्सव टिकवून ठेवले असून यामध्ये घणसोली ग्रामस्थांचा अग्रक्रम आहे. मनपा क्षेत्रातील सर्वात मोठे गाव असलेल्या घणसोलीला स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी आहे. अनेक थोर स्वातंत्र्य सेनानींनी येथे उपस्थिती दर्शविली आहे. मुंबई व ठाणेमधील स्वातंत्र्य सैनिक व तळकोकण यामधील दुवा साधण्याचे काम या गावामुळे शक्य झाले होते. स्वातंत्र्य चळवळ मोडीत काढण्यासाठी इंग्रजांनी येथे तळ ठोकला होता. जमावबंदी आदेश सुरू केल्यामुळे ग्रामस्थांनी श्रावण महिन्यातील प्रथमा ते गोकुळाष्टमीपर्यंत अखंड २४ तास भजन करण्यास सुरवात केली. १९०७ मध्ये कौलआळीतील कृष्णा शिनवार पाटील यांच्या घरामध्ये हा महोत्सव सुरू केला. १९१४ मध्ये तो गावच्या हनुमान मंदिरामध्ये हलविण्यात आला. तेव्हापासून अखंडपणे मंदिरामध्येच हा उत्सव साजरा होत आहे. गावातील प्रत्येक आळीमधील नागरिक रोज दोन तास भजन म्हणतात. दहीहंडी दिवशी गावातून देवाचा पालखी सोहळा आयोजित केला जातो. प्रत्येक वर्षी गावातील हंड्या फोडण्याचा मान एका आळीतील तरूणांना दिला जातो. यावर्षी पाटील आळीला हा बहुमान मिळणार आहे. कौलआळी, कोळी आळी, म्हात्रे आळी, चिंचआळी, नरवघर आळी व पाटील आळीमधील व गावात राहण्यासाठी आलेले इतर भाविकही या उत्सवामध्ये आनंदाने सहभागी होत असतात. शुक्रवारी या उत्सवाला सुरूवात झाली आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष द्वारकानाथ भोईर व इतर सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सवाची सुरवात झाली. या उत्सवाविषयी माहिती देताना ग्रामस्थ स्वातंत्र्यलढ्यामधील गावच्या योगदानाविषयी अभिमानाने बोलतात. इंग्रजांनी जमावबंदी आदेश जारी केला असला तरी धार्मिक कार्यक्रमांवर बंदी नव्हती. यामुळेच गोकुळाष्टमी महोत्सवाच्या माध्यमातून नागरिक एकत्र येवून देवाच्या नामस्मरणाबरोबर स्वातंत्र्य लढा कसा पुढे न्यायचा यावर विचारविमर्श करत होते. गावातील सर्व नागरिक यामध्ये सहभागी होत असल्याची माहिती माजी नगरसेवक दीपक पाटील यांनी दिली आहे. >स्वातंत्र्यलढ्यातील घणसोलीचे योगदान स्वातंत्र्यलढ्यामध्ये घणसोलीचे योगदान महत्वाचे आहे. शंकर शनिवार पाटील, रामा दिवट्या रानकर, महादू पाटील, आबा लडक्या पाटील, पदा पोशा पाटील, वामन पाटील, रघुनाथ कृष्णा पवार, नारायण मढवी, वाल्मीकी महादू पाटील, चाहू पाटील, जोमा पाटील, बाळचा पाटील, परशुराम पाटील, हल्या हिरा म्हात्रे या स्वातंत्र्यसैनीकाचे छोटे स्मारकही मंदिराच्या परिसरात आहे.