मुंबई : भारत हा मधुमेह रुग्णांमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर असून, त्याला भारतीयांची जीवनशैली जबाबदार आहे. मधुमेह टाळायचा असेल तर मैदानी खेळ आणि व्यायाम करायला हवा. अन्यथा मधुमेहावर नियंत्रण मिळवणे अशक्य होईल, असे प्रतिपादन पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. केईकी मेहता यांनी रविवारी आयआयटी मुंबई येथे केले. आयआयटी मुंबई वार्षिक विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सव आणि रोटरी क्लब मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्युअर्ड’ (कॅन यू रिअली एस्केप डायबिटीस) या मधुमेहावरील चर्चासत्राचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. केईकी मेहता बोलत होत्या. रोटरी ३१४१ डिस्ट्रीक्ट गव्हर्नर गोपाल मंधानिया, रोटरी ३१४१चे चिफ प्रोजेक्ट डायरेक्टर अरुण भार्गावा, आयआयटी मुंबईच्या प्राध्यापक सोम्यो मुखर्जी, डायबिटोलॉजिस्ट डॉ. प्रदीप गाडगे या वेळी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत ‘आयआयटी मुंबईशी संलग्न अशा क्युअर्ड’ संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. डॉ. मेहता यांनी मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठीच्या अगदी साध्या सोप्या उपाययोजना सांगितल्या व तरुणांच्या बदलत्या जीवनशैलीतील दोष दाखवून दिले. आयआयटी मुंबईच्या डीन आॅफ स्टुटंट अफेअर्स प्राध्यापक सोम्यो मुखर्जी यांनी यावेळी आयआयटीच्या टेकफेस्ट टीमचे कौतुक केले. या माध्यमातून मधुमेहाची मोफत तपासणी करण्यात येणार असून मधुमेहाविषयी जनजागृती करण्याचा हेतू यामागे असेल, असे आयोजकांकडून सांगण्यात आले.आयआयटीचा ‘टेकफेस्ट’ हा सर्वांत मोठा महोत्सव असून, यात देशभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. यंदा तरुणांना सामाजिक कार्याची गोडी लागावी म्हणून याचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)
मधुमेह टाळण्यासाठी जीवनशैली बदलणे आवश्यक
By admin | Published: August 26, 2016 1:56 AM