कळंबोली : कळंबोली सर्कल येथून सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी कळंबोली वाहतूक शाखेने विशेष मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांत जवळपास तीनशेपेक्षा जास्त जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून पावणेतीन लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. त्यामध्ये परवाना उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कडक कारवाईमुळे अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसला आहे. कळंबोली सर्कल येथे जंक्शन म्हणून ओळखले जाते. या ठिकाणाहून पनवेल-सायन, मुंबई-पुणे द्रुतगती, एनएच ४ बी, एनएच ४ हे महामार्ग जातात. मुंबई-पुणे, जेएनपीटी, कल्याण, कोकणात जाण्याकरिता कळंबोली सर्कलचा वापर करावा लागतो. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अरविंद साळवे यांनी अवैध प्रवासी वाहतूक व वाहन परवाना उल्लंघन करणाऱ्यांवर धडक मोहीम हाती घेण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मॅजिक, ट्रॅव्हल्स व इतर वाहन वाहतूक पोलिसांच्या रडारवर आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक, टप्पा वाहतुकीची परवानगी नसताना थांबून प्रवासी वाहतूक करणे, वाहन परवान्याकरिता नियम आणि अटीचे उल्लंघन करणे, क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे आदी वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. प्रभारी अधिकारी गोरख पाटील यांनी पदभार घेतल्यानंतर चिरीमिरीला पूर्णपणे आळा घालण्यात आला आहे. नियमानुसार कारवाई करून कर्तव्य पार पाडण्याच्या सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे कारवाईचे प्रमाण वाढले आहेच त्याचबरोबर वाहनचालकांना शिस्त लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक जवळपास बंद झाली आहे. तसेच परवाना उल्लंघन करणाऱ्यांची संख्या घटली असल्याचे दिसून आले आहे. (वार्ताहर)
अवैध प्रवासी वाहतुकीला आळा
By admin | Published: May 17, 2016 4:02 AM