ऑनलाइन लोकमतशिर्डी, दि.७ - राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या कलंकित सदस्यांचा समावेश टाळावा; अन्यथा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सरकारला तीव्र रोषाला तोंड द्यावे लागेल, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.महाराष्ट्रातील भाजप-शिवसेना सरकारच्या संभाव्य विस्ताराबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना विखे पाटील यांनी सांगितले की, सार्वजनिक पैशाचा अपहार आणि जनतेची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप असलेल्या काही आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रसारमाध्यमांमधून समोर आली आहे. मुळातच मंत्रिमंडळातील निम्म्या सदस्यांवर आर्थिक व नैतिक भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आहेत. यासंदर्भात वारंवार दाद मागितल्यानंतरही सरकारने संबंधित मंत्र्यांचे राजीनामे घेतले नाहीत. त्यामुळे सरकारने कलंकित मंत्र्यांच्या यादीत आणखी भर घालून महाराष्ट्रातील जनतेची अधिक फसवणूक करू नये, असा इशारा विरोधी पक्षनेत्यांनी दिला.मागील दीड वर्षात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वाजलेले तीन-तेरा आणि शेतकऱ्यांची झालेली दयनीय अवस्था पाहता या विस्तारात महाराष्ट्राला पूर्णवेळ गृह मंत्री आणि पूर्णवेळ कृषि मंत्री द्यावेत, अशीही मागणी विखे पाटील यांनी केली आहे.