नागपूर : मुंबई शहरात विकास नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करून नियमबाह्य चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याच्या प्रकाराला आळा घालण्यात येईल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. पार्ट रहिवासी प्रमाणपत्राच्या आधारे अतिरिक्त एफएसआय मिळणार नाही. यासाठी उपाययोजना करण्यात येतील. मुंबईतील अनधिकृत अतिरिक्त बांधकामांना आळा घालण्यासंदर्भात अधिवेशनानंतर लवकरच सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. विकास नियंत्रण नियमावलीचे तरतुदीनुसार अधिक चटई क्षेत्र निर्देशांक उपलब्ध होत असल्यास त्याप्रमाणे चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय करणे क्रमप्राप्त राहते. तथापि अशा चटई क्षेत्र निर्देशांकाचा भार पेलण्यास इमारत सक्षम असल्याबाबत संरचनात्मक स्थैर्याबाबत प्रमाणपत्र प्राप्त करूनच पुढील कार्यवाही करण्यात येते, अशी माहिती त्यांनी दिली.किरण पावसकर यांनी मुंबई शहरात पुनर्विकास नियमावलीच्या अंतर्गत पुनर्बांधणीची कामे विकासकाकडून होत असताना इमारतीचे काम झाल्याचे रहिवासी प्रमाणपत्र मिळाल्याचे सांगून घराची विक्री केली जाते. मात्र इमारत पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र न घेता काही वर्षांनी वाढीव चटई क्षेत्र मिळाल्याचे दाखवून त्याच इमारतीवर अधिक मजल्याचे बांधकाम अथवा इतर वाढीव बांधकाम केले जात असल्याचे निदर्शनास आले. (प्रतिनिधी)
नियमबाह्य एफएसआयला आळा घालणार
By admin | Published: December 17, 2015 2:48 AM