मुंबई : सीएसटी ते ठाणे सगळ्या मार्गांवर डीसी ते एसी परावर्तनाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असून त्याची चाचणी मध्य रेल्वेकडून घेतली जाणार आहे. २0 डिसेंबरच्या रात्री साडे दहा वाजल्यापासून सकाळी साडे सात वाजेपर्यंत चालणाऱ्या या चाचणीमुळे सीएसटीहून सुटणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. २0 डिसेंबरच्या रात्री साडे दहा वाजता शेवटची लोकल सुटल्यानंतर थेट बारानंतर कसारा आणि कर्जतच्या लोकल सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असून रात्रीचा प्रवास टाळा असे आवाहन रेल्वेने केले आहे. ठाणे ते कल्याण आणि त्यापुढे (डाऊन दिशेला) १,५00 डीसी (डायरेक्ट करंट) ते २५000 एसीचे (अल्टरनेट करंट) काम पूर्ण करण्यात आले आहे. तर ठाणे ते एलटीटीपर्यंत लांब पल्ल्याच्या मार्गावर हे काम करण्यात आले असून ठाणे ते सीएसटी सर्व मार्गांवर डीसी ते एसीचे काम बाकी होते. हे काम नुकतेच आॅक्टोबर महिन्यात पूर्ण करण्यात आले. मात्र या परावर्तनाची ठाणे ते सीएसटीपर्यंत चाचणी करण्यात न आल्याने ती करण्याचा निर्णय आता मध्य रेल्वेने घेतला आहे. २0 डिसेंबरच्या (शनिवारी) रात्री साडे दहा वाजल्यापासून या मार्गांवर डीसी-एसी परावर्तनाची चाचणी होईल आणि ही चाचणी रविवारी सकाळी साडे सात वाजेपर्यंत सुरु राहील. त्यामुळे २0 डिसेंबरच्या रात्री साडे दहा वाजता शेवटची लोकल सीएसटीहून सुटेल आणि त्यानंतर बारा वाजेपर्यंत एकही लोकल सुटणार नाही. मध्यरात्री १२.१0 वाजता कसारा आणि १२.३0 वाजता कर्जत लोकल सोडण्यात येईल. कसारा आणि कर्जत या दोन्ही लोकल डीसी-एसी परावर्तनाच्या कामामुळे डिझेलवर धावतील. (प्रतिनिधी)
मध्य रेल्वेचा प्रवास शनिवारी रात्री टाळा
By admin | Published: December 18, 2014 5:36 AM