राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीनंतर सांगलीत प्रचाराला पोहोचले आहेत. काही महिन्यांपूर्वी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोल्हापुरातील शिवसेनेच्या कार्यक्रमात भेट घेण्याचा प्रयत्न केलेला. परंतु, शिंदे तिथे न आल्याने भिडे माघारी फिरले होते. आता भिडेंनी थेट देवेंद्र फडणवीस यांना गाठत त्यांची भेट घेतली.
लोकसभा निवडणूक असल्याने फडणवीस त्या त्या ठिकाणच्या लोकांना, नेत्यांना भेटत आहेत. सांगलीला फडणवीस अजित पवारांसह हेलिकॉप्टरने आले होते. हे दोघे कवलापूर विमानतळावर येणार असल्याचे कळताच भिडे यांनी तिथे उपस्थिती लावली. फडणवीस हेलिकॉप्टरमधून उतरल्यावर भिडेंनी त्यांची भेट घेतली.
काही वेळ चर्चा झाल्यानंतर फडणवीस तिथून निघाले. यावेळी भिडे फडणवीसांच्या कानात काहीतरी सांगत होते. ही चर्चा नेमकी काय झाली हे समजू शकलेले नाही. सांगलीचे महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. यासाठी फडणवीस आणि अजित पवार आले होते.
सांगलीत दोन दिवसापूर्वी एक अपक्ष अर्ज भरला, त्यांना मी लहान असल्यापासून बघतोय. राजकारणातील परिपक्व नसलेलं नेतृत्व काय तर त्या मुलाकडे आपण सगळी बघतोय, असा टोला खासदार संजयकाका पाटील यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील यांना लगावला. त्यांनी मोठं मोठ्या वल्गना केल्या, घोषणा केल्या. त्यांनी १०, २० मुलांना ओरडायला लावलं, असा आरोपही संजयकाका पाटील यांनी केला.