कल्याण लोकसभेत महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा प्रचार करण्यासाठी उद्धवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख विवेक खामकर यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. गेली २१ महिने संघर्ष करून या ठिकाणी पक्ष सांभाळला. लोकसभा निवडणुकीचा आवाका हा व्यापक असतो, या ठिकाणी वरिष्ठ मंडळींनी लक्ष घालायला हवे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर प्रचारात सक्रिय होऊ, असे खामकर सांगत असल्याची कुजबुज ठाकरे सेनेत सुरू आहे. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आदेशाची वाट पाहत आहेत.
बच्चू कडूंचा संघर्ष कुणासाठी?
अमरावती लोकसभा मतदारसंघात बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेतर्फे दिनेश बूब यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. बच्चू कडूंनी उमेदवार दिल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. काँग्रेसतर्फे बळवंत वानखडे, भाजपतर्फे विद्यमान खासदार नवीनत राणा आणि प्रहारचे दिनेश बूब या सामन्यात कोण जिंकणार याबाबत उत्सुकता आहे. या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत झाली असती तर भाजपला विजयासाठी संघर्ष करावा लागला असता. मात्र भाजपच्या नवनीत राणांना पराभूत करण्यासाठी आपण उमेदवार रिंगणात उतरवला असल्याचे बच्चू कडू सांगत आहेत. त्यासाठी बच्चू कडूंची भली मोठी रॅली अमरावतीत काढण्यात आली. ही रॅली बघून मतविभाजनात भाजपला फायदा होईल अशी कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू असून कडूंचा संघर्ष कुणासाठी असा प्रश्न विचारला जात आहे.