प्रशांत शेडगे,
पनवेल-प्रस्तावित पनवेल महापालिकेबाबत गठीत केलेल्या समितीचा अहवाल तयार झाला आहे. अंतिम बैठकीत त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होणार आहे. महापालिकेकरिता जवळपास सगळ्याच यंत्रणा सकारात्मक आहेत. अहवाल सादर झाल्यानंतर शासनाकडून लवकरच घोषणा होईल असे आडाखे बांधले जात आहेत. त्यामुळे या भागातील विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा बळावली आहे. अनेकांना नगरसेवक होण्याचे वेध लागल्याने त्यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पनवेल शहर व नवीन पनवेल, खांदा वसाहतीचा पनवेल नगरपालिकेत समावेश होतो. मात्र नवीन पनवेल पूर्व आणि पश्चिम भागाकरिता विकास प्राधिकरण म्हणून सिडको आहे. त्यामुळे एकूण १६ नगरसेवकांना काहीच काम उरत नाही. ते फक्त नावापुरतेच नगरसेवक आहेत. सगळी कामे सिडकोकडून होत असल्याने पालिकेचा त्यामध्ये नावापुरताच संबंध आहे. महापालिका झाल्यानंतर या भागातील नगरसेवकांना खऱ्या अर्थाने काम करता येणार आहे. नवीन पनवेलबरोबरच कळंबोली, कामोठे, खारघर, उलवे या सिडको विकसित नोडचा महानगरपालिकेत समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. कळंबोली, कामोठे येथील अनेक पदाधिकारी महानगरपालिका होणार म्हणून खूश आहेत.कित्येक जणांना नगरसेवक होण्याचे वेध लागले आहे. काहींनी तयारी सुध्दा सुरू केली असून आपल्या परिसरात संपर्क वाढविण्यास सुरूवात केली आहे. एकूणच प्रस्तावित महापालिकेमुळे अनेकांना नगरसेवकपदाचे वेध लागले आहेत.