मुंबई : अनुदानित खासगी शाळांतील शिक्षकांना निवृत्तीनंतर मात्र वेतनासाठी पालिकेचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. एका शिक्षिकेला निवृत्तिवेतनासाठी शिक्षण खात्यात फेऱ्या मारून हृदयविकाराचा झटका आला़ तर अंधेरी येथील एका शिक्षिकेला पाय गमवावा लागला़ अशा घटनांमुळे शिक्षण खात्याचा हृदयशून्य व भोंगळ कारभार उघड होत असल्याचा संताप सर्वपक्षीय सदस्यांनी शिक्षण समितीमध्ये व्यक्त केला़याबाबत शिवसेनेच्या यामिनी जाधव यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत माहिती दिली़ कुर्ला, बैलबाजार येथील शाळेचे वीज बिल भरले नाही म्हणून तेथील निवृत्त मुख्याध्यापिकेला निवृत्तिवेतन नाकारण्यात आले़ तर मुलुंड येथील एका शिक्षिकेने निवृत्तिवेतनाच्या प्रतीक्षेतच जगाचा निरोप घेतला़ आता त्यांच्या मृत्यूनंतर निवृत्तिवेतनासाठी वारसाचा शोध अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे़ खासगी शाळांमधील निवृत्त शिक्षकांच्या अशा व्यथा अनेक सदस्यांनी मांडल्या़ शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी काही शिक्षिकांची पत्रेही वाचून दाखविली़ वीणा गैर नामक शिक्षिकेला निवृत्तिवेतनासाठी फेऱ्या मारून हृदयविकाराचा झटका आला़ अंधेरी येथील माधवी जाधव या शिक्षिकेला पाय गमवावा लागला, अशी खंत सदस्यांनी मांडली़ यावर खुलासा करताना निवृत्तिवेतन वितरणाबाबत धोरण आखण्यात आले असून लवकरच समितीपुढे मंजुरीसाठी येईल, असे प्रशासनाने सांगितले़ मात्र थातूरमातूर कारणासाठी निवृत्तिवेतन अडकवणे योग्य नसल्याचे मत शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी व्यक्त केले़ (प्रतिनिधी)
निवृत्तिवेतनाची प्रतीक्षा शिक्षकांसाठी जीवघेणी
By admin | Published: October 23, 2014 4:02 AM