पुणे : वातावरणातील बदल आणि शहरीकरणामुळे रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेऊन पुणे महापालिकेतर्फे जगजागृतीसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये आता पालिकेने आणखी एक शक्कल लढवली असून पुण्यातील सर्व नाट्यगृहांमध्येही डेंगी आणि चिकुनगुनिया या आजारांबाबत जगजागृती करण्यात येणार आहे. सध्या शहरात कीटकजन्य आजारांच्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांमध्ये या आजाराबाबत जागृती व्हावी, यासाठी हा उपक्रम करीत असल्याचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. कल्पना बळीवंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. हे आजार शहरात वेगाने पसरत असल्याने या आजारांविषयी योग्य ती माहिती व्हावी आणि त्याबाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबत माहिती व्हावी, यासाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या. यासंदर्भातील पत्रे शहराच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सोमवारी देण्यात आली असून एक-दोन दिवसांत हे जनजागृतीचे काम प्रत्यक्षात सुरू होईल. यामध्ये नागरिकांनी काय करावे, आणि काय करू नये, अशा माहितीचे पत्रक कोणतेही नाटक किंवा कार्यक्रमाच्या आधी प्रत्येकाला वाटले जाणार आहे. याशिवाय या पत्रकातील मजकूर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून वाचूनही दाखविला जाणार आहे. त्यामुळे कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकापर्यंत या आजारांबाबतची माहिती मिळण्यास मदत होर्ईल. (प्रतिनिधी)>सहकार्याचे आवाहनशहरांतील नाट्यगृहांतील व्यवस्थापनाने व नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही पालिकेच्या कीटक प्रतिबंध विभागामार्फत करण्यात आले आहे. शहरातील बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक स्मारक मंदिर, भरत नाट्य मंदिर, जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, अण्णा भाऊ साठे सभागृह, भीमसेन जोशी नाट्यगृह, महात्मा फुले सांस्कृतिक भवन या ठिकाणी यासंबंधीची पत्रे पाठविण्यात आली असल्याचे डॉ. कल्पना बळीवंत म्हणाल्या.
नाट्यगृहांमध्ये डेंगीविषयी जागृती
By admin | Published: September 20, 2016 1:36 AM