२९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी : विदर्भातील गुंतवणुकदारांची २५० कोटींनी फसवणूकयवतमाळ : जागृती अॅग्रो फुड्स अँड इन्फ्रा प्रोजेक्ट या कंपनीने ७० महिन्यात शेतीपूरक व्यवसायात गुंतवणुकीच्या दहापट मोबदला देण्याचे आमिष दाखवून विदर्भातील शेतकरी गुंतवणुकदारांची २५० कोटींपेक्षा अधिक रकमेने फसवणूक केली आहे. या कंपनीची प्रमुख संचालिका जाई राज गायकवाड (३४) हिला भंडारा येथून ताब्यात घेऊन यवतमाळात आणण्यात आले आहे.भंडारा जिल्ह्याच्या लाखणी पोलिसांनी जाई गायकवाड हिला औरंगाबादमधून ताब्यात घेतले होते.
जाईसह अन्य नऊ जणांविरुद्ध यवतमाळातील वडगाव रोड पोलीस ठाण्यातही सुमारे पाच कोटी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी १९ फेब्रुवारी २०१५ रोजी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक लष्करे, सहायक निरीक्षक पतिंगे यांनी जाई गायकवाड हिला लाखणी पोलिसांकडून ताब्यात घेतले. बुधवारी येथील न्यायालयापुढे हजर केले असता २९ जुलैपर्यंत तिला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश बजावण्यात आले आहे.
जाईला ताब्यात घेण्यासाठी अमरावती पोलीसही प्रयत्नरत आहे. पंढरपुरात नोंदणीकृत, तर सांगलीत कार्पोरेट कार्यालय असलेल्या जागृती अॅग्रो फुड्सने महाराष्ट्रासह शेजारील राज्यातील शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. राज गायकवाड हा या कंपनीचा सूत्रधार आहे. त्याला कर्नाटकातील बिदर पोलिसांनी अटक केली होती. तेथे या कंपनीची १४०० कोटी रुपयांची संपत्ती सील केली गेली असल्याचे सांगितले जाते. या कंपनीचे युनियन बँकेत ठिकठिकाणी खाते आहे. त्यातच गुंतवणुकदारांच्या रकमा जमा झाल्या होत्या.
या कंपनीचे शेती, घरे, ठेवी अशी शेकडो कोटींची मालमत्ता आहे. युनियन बँकेतील ठेवी सील केल्या गेल्याचे सांगण्यात येते. या कंपनीने पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना सुमारे २५० कोटी रुपयांनी गंडा घातला आहे. फसविले गेलेले हे शेतकरी गुंतवणुकदार फेब्रुवारी २०१६ मध्ये चिमूर येथील एका सत्कार समारंभाच्या निमित्ताने भाजपाच्या विदर्भातील एका ज्येष्ठ नेत्याच्या आश्रयाला गेले होते. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या दरबारातही पोहोचले आहे.
मात्र गुंतवणुकीतील पैसा परत मिळण्याबाबत कोणत्याच हालचाली झाल्या नसल्याने शेतकरी वर्ग भाजपच्या या नेत्यावर नाराज आहे. यवतमाळातसुद्धा पाच कोटी रुपयांनी शेतकरी फसविले गेले आहे. परंतु मोहदा व सावळीच्या ज्या नेत्यांनी या कंपनीचे ह्यमार्केटिंगह्ण केले त्यांना त्यांचा मोबदला, शेळ्या, शेड, शेताला कंपाऊंड असे सर्वच काही परत मिळाले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन गुंतवणूक करणारे अन्य शेतकरी मात्र अद्याप मोबदल्याच्या प्रतीक्षेतच आहे. विशेष असे, जिल्ह्यात या कंपनीच्या प्रकल्पांचे सत्ताधारी नेत्यांनी ठिकठिकाणी उद्घाटन केले होते.
जागृती अॅग्रो फुड्स कंपनीचे प्रमुख नऊ संचालक आहेत. त्यापैकी आतापर्यंत राज गायकवाड, जाई गायकवाड व महाव्यवस्थापक सुजित चव्हाण या तिघांनाच अटक झाली आहे. या कंपनीविरुद्ध पुण्यासह राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
१५ महिन्यांचा मुलगाही सोबतजाई गायकवाड यांना पोलिसांनी अटक केली. मात्र त्यांचा १५ महिन्यांचा मुलगाही त्यांच्यासोबत आहे. आईसोबत तान्हुल्या मुलालाही अप्रत्यक्ष मिळणारी कोठडी पाहून फसवणूक झालेल्या शेतकरी गुंतवणुकदारांचे हृदय द्रवत आहे, तर काहींनी सहानुभूती मिळविण्यासाठी हा प्रकार असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त केली.