प्रभु पुजारी
सोलापूर, दि. ४ : पावसाचा खेळ..., धरतीवर हिरवागार गालिचा पसरलेला..., बोटभर, इतभर वाढलेलं गवतपाला चरणारी गुरंढोरं, ओढ्या-नाल्यातील खाचखळग्यात पावसाचं पाणी साठलेलं, सारा निसर्ग हिरवाईनं नटलेला़ असा अद्भुत नजारा सृष्टीला प्रदान करणाऱ्या आषाढ महिन्यास आजपासून प्रारंभ होत आहे़ कवी कालिदासांच्या शब्दकुंचल्यातून अवतरलेला मेघ आज आभाळात फिरतो आहे, पळतो आहे़ पळणाऱ्या मेघांची दाटी पाहून जीव आणि नेत्र जरी सुखावले असले तरी धरणीमातेची तहान मात्र भागलेली नाही़ तुरळक पावसाच्या सरीने सर्वत्र रानगवत उगवले आहे़.
आषाढातील जोरदार वाऱ्यामुळे हे गवत खुशीने डोलत आहे़ रानफुले डुलत आहेत, पण काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत़ काही ठिकाणी पेरण्या झाल्या, मात्र अंकुर उगवून येताच पीक कोमेजून जात आहे़.
परिणामी शेतकरी चिंतेत आहेत़ काळ्याकुट्ट ढगांच्या शर्यतीमुळे धरतीवर ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे़ ह्यआभाळ भरून येतंय पण वारं त्याला पुढं नेतंय अशी परिस्थिती आज झाली आहे़ अस्सल ग्रामीण शेतकऱ्याच्या भाषेत बोलायचं तर ह्यहे ढग, हे मेघ, वांझोट झालं आहेह्ण अशी प्रतिक्रिया उमटत आहे़ आषाढाच्या आगमनाने सर्वत्र उल्हास जरी संचारला असला तरी उत्साह मात्र मावळलेलाच आहे़ संपूर्ण जिल्हा आणखी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे़.
ही प्रतीक्षा लवकर संपावी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकवटलेला वारकरीसुद्धा पांडुरंगाकडे साकडे घालत आहे़ आज जरी कालिदासांच्या कुंचल्यासारखा मेघ बरसत नसला तरी बळीराजाच्या आशा मात्र जिवंत आहेत़ जर मेघ बरसला तरच आषाढाच्या या उल्हासात उत्साहाचा भर पडेल अन् अवघी सृष्टी विठ्ठलनामाच्या जयघोषात लीन होईल़