ऑनलाइन लोकमत
कळस(पुणे), दि. 23 - कळस (ता. इंदापूर) येथे सोमवारी (दि. २२) देशातील पहिला दोन निर्जीव वस्तूंचा विवाह सोहळा साजरा झाला. यामध्ये विजयीभव (टिकावराव) श्रीमंत पाणीदार जलसंधारण, कळसकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र (ता. इंदापूर, जिल्हा पुणे) व भुवजचुंडेमंडीत (फावडेताई) श्रीमंत सुजलाम सुफलाम निरगुडेकर (रा. निरगुडे, ता. इंदापूर, जिल्हा पुणे) यांची ज्येष्ठ कन्या, हा देशातील आगळावेगळा ‘पाणी फाउंडेशन’ सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा- २०१७ श्रमदान लग्नसोहळा आज दोन्ही गावांच्या मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या थाटामाटात सायंकाळी झाला.
या वेळी दोन्ही गावचे वºहाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आहेर म्हणून झाडांच्या बिया व रोपे स्वीकारण्यात आली. हा लग्न समारंभ येथील गुरवाचा ओढा या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. येथे मागील ४५ दिवसांपासून सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस होता. पाणी फाउंडेशनची स्पर्धा सुरू झाल्यापासून लोकांचा सहभाग कमी असल्याने अपेक्षित काम झाले नाही. त्यामुळे कळसकर आणि निरगुडे या दोन गावांमध्ये एका टिकावापासून व एका फावड्यापासून सुरू झालेले काम भविष्यात श्रमदान, जलश्रमदान ही लोकचळवळ निर्माण व्हावी. म्हणून कळस येथे आगळा आणि वेगळा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम झाला. या लग्नसोहळ्याच्या लग्नपत्रिकाही वाटण्यात आल्या होत्या. तसेच ब्राह्मण, विधिवत पूजा, अक्षदा, मंगलाष्टका, पाण्याची व जेवणाची सोय देखील करण्यात आली होती. लग्नसमारंभासाठी विविध गावांतील जनसमुदाय जमा झाला होता.
डॉ. पोळ यांच्यामुळे प्रेरणा...
वास्तविक कळस गाव जलसंधारण कामासाठी एकत्र यायला तयार नव्हते. पण यासाठी पाणी फाउंडेशनचे राज्य समन्वयक डॉ. अविनाश पोळ यांच्या मार्गदर्शनानंतर काही प्रमाणात तरुण एकत्र येऊन त्यांनी गावाचे चित्र बदलवले. इंदापूर तालुक्यात हा एक अनोखा विवाहसोहळा पार पडला. निमित्त होते सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या अखेरच्या दिवसाचे. या स्पर्धेत इंदापूर तालुक्यातील २२ गावांचा समावेश होता. अनेक गावे वेगवेगळ्या पद्धतीने श्रमदान करत होते. तालुक्यातील कळस व निरगुडे या दोन्ही गावांनी मात्र एक अनोखी शक्कल लढवली. श्रमदानात महत्त्वाचे हत्यार असलेले टिकाव व फावडे (खोरे) यांचं लग्न लावून अनोख्या पद्धतीनं त्यांनी श्रमदान केलं.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी या लग्नाची तारीख ठरवली गेली. कळसगावचा टिकावराव तर निरगुडेगावची फावडेताई. लग्न जरी या निर्जीव वस्तूंचे असले तरी खºयाखुºया लग्नासारखे लग्न लावण्यात आले. पत्रिका काढण्यात आल्या. लग्नाच्या अगोदरच्या दिवशी नवरा व नवरीला हळद लावण्यात आली. हळदी समारंभ मोठ्या धूमधडाक्यात करण्यात आला. लग्नाच्या दिवशी नवरदेवाच्या गावी म्हणजेच कळसला लग्नाची तयारी केली होती.
पुढच्या वर्षी करणार टिकावराव-फावडेताईचा सामुदायिक विवाह...
एक टिकाव व एक फावडे एकत्र आणले तर मोठ्या प्रमाणात काम होईल. आगामी काळात त्यांची संख्या ५० झाली तर पूर्ण गाव दुष्काळमुक्त व टँकरमुक्त होईल. त्यामुळे पुढच्या वर्षीदेखील यांचा सामुदायिक विवाह सोहळा करण्याचा निरगुडे व कळस गावाचा मनोदय आहे. कळस व निरगुडे या गावात श्रमदान व यांत्रिकीकरणाचे काम दुष्काळमुक्तीसाठी टाकलेले एक पाऊल. हा विवाह सोहळ्यातून एक संदेश देण्यात आला. सामाजिक विकासासाठी चळवळीचे रूपांतर लोकचळवळीत होण्यासाठी काही कालावधीची गरज असते. या चळवळीत स्वार्थी माणसे आली, की चळवळ नामशेष होते. नि:स्वार्थी माणसे एकत्र आली, की चळवळ हळूहळू जोमात वाढते. कळस व निरगुडे या गावांना स्पर्धेचा ४५ दिवसांचा कालावधी काही प्रमाणात काम पण लोक एकत्र आणण्यात गेला. अखेरीस लोक एकत्र आले. जलसंधारण कामासाठी वापरले जाणारे साहित्य म्हणजे टिकाव व फावडे यांचा लग्नसमारंभ करून पुढील काळासाठी संसार थाटला आहे. त्यामुळेच भविष्यात या गावांची कामे संपूर्ण देशाला दिशादर्शक असतील व सातत्यपूर्ण श्रमदानातून ही गावे पुढच्या वर्षीच दुष्काळावर मात करतील.