भुलेश्वर : पुरंदर तालुक्यात आज दुष्काळी परिस्थिती असली तरी पावसाचे वातावरण तयार होत असून पुरंदरचा शेतकरी आजही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पुरंदर तालुक्यात खरीप हंगामात अल्प प्रमाणात पाऊस झाला. जमिनीत पेरणीयोग्य ओल झाल्याने मोठ्या प्रमाणात बाजरी, मूग, झटपट उत्पन्न मिळवून देणारा वाटाणा, भुईमूग आदी पिकांच्या मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली. जमिनीत पुरेशी ओल असल्याने पिकाची उगवणही चांगली झाली. मात्र पुन्हा पावसाने हुलकावणी दिल्याने उगवून आलेली पिकेही जळून गेली. अल्प प्रमाणात पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी पिके जगवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. यासाठी काही शेतकऱ्यांना पुरंदर उपसा जलसिंचन योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला. वाटाणा पीक काहीअंशी पदरात पडले, परंतु वातावरणात अधिक तापमान असल्याने शेंगा व दाणा भरण्यास अनेक अडचणी आल्या.यामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न निघाले नाही. यामुळे खरीप हंगाम मोठ्या प्रमाणात वायाच गेला.वाया गेलेल्या खरीप हंगामाची तूट रब्बी हंगामात भरून निघेल, या आशेवर पुरंदरचा शेतकरी पावसाची वाट पाहत असताना पुन्हा एकदा अल्प पावसाने रब्बी हंगामाची सुरुवात झाली. जमिनीत पुरेशी ओल असल्याने मोठ्या प्रमाणात ज्वारीची पेरणी करण्यात आली. उगवणही चांगली झाली. यामुळे पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेरणी करण्यात आली. मात्र पाहिजे त्या प्रमाणात पाऊस झाला नाही. अनेक भागात तर पडलाच नाही, यामुळे माळरानावरील ज्वारी तर करपली. मात्र बागायती भागात ज्वारीचे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्न निघाले नाही. परंतु अनेक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे ज्वारी झाली.पुरंदर तालुक्यात दरवर्षीपेक्षा कांद्याच्या लागनी तीव्र पाणीटंचाईमुळे कमी झाल्या. पुरंदर उपसा जलसिंचन योजनेच्या जीवावर अनेक भागांत लागणी करण्यात आल्या. मात्र बाजारभाव समाधानकारक न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. पुरंदर तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला तर वर्षभर पुरेल एवढा धान्यसाठा पिकवता येतो. कांदा, वाटाणा यांसारखी पिके घेऊन वर्षभर आर्थिक चणचण कमी करता येते. यासाठी चालू वर्षी समाधानकारक पावसाची गरज आहे. समाधानकारक पाऊस होण्यासाठी शेतकरी ग्रामदेवतेस साकडे घालत आहे. यासाठी पुरंदरचा शेतकरी आजही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.>पावसाची सरासरी कमी : ३५२ मिलिमीटरपुरंदर तालुक्यात २००९ ते १० मध्ये ९०४ मिलिमीटर पाऊस पडला. तेव्हापासून आतापर्यंत पावसाची सरासरी कमी कमी होत गेली. त्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी कमी होत गेली. २०१५-१६ या वर्षी ३५२ मिलिमीटर म्हणजेच सर्वात कमी पाऊस पडला. यामुळे यंदा तर तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. जून महिन्याच्या सुरुवातीला जर पावसाने सुरुवात केली तर पेरणी सुरळीत होते. यासाठी पाऊस सुरू होणे गरजेचे आहे.
जोरदार पावसाची प्रतीक्षा
By admin | Published: June 09, 2016 1:43 AM