मुंबई : राज्यात रविवारी आणि सोमवारी झालेल्या अवकाळी पावसाने दाणादाण उडविली वीज पडून तिघांचा बळी गेला आहे. मराठवाड्यात १०७ मंडळांत तर खान्देशात २८ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पाऊस व गारांमुळे ऊस, केळी,पपई, मका व तूर या पिकांना फटका बसला आहे. विदर्भात संत्रा कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. या पावसाने खरीपातील पिकांची हानी केली असली तरी रब्बी हंगामातील हरभरा, गहू व ज्वारी अशा काही पिकांना हा पाऊस लाभदायक ठरणारा आहे.
मराठवाड्यात १०७ मंडळांत अतिवृष्टी- विकास राऊतछत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याला रविवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. विभागात ४०.४ मि.मी म्हणजेच, दीड इंच पावसाची नोंद एकाच रात्रीत झाली. १०७ मंडळांत अतिवृष्टी झाली. त्यात एकाचा वीज पडून मृत्यू झाला, तर २३ लहान व मोठी ९ जनावरे दगावली. जालना ७०.७, परभणी ६५ मि.मी., तर हिंगोली जिल्ह्यात ६५.८ मि.मी. म्हणजेच अतिवृष्टीची नोंद झाली आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील चिमेगावातील राजू जायभाये (वय ३२) याचा वीज पडल्याने मृत्यू झाला.
कपाशी भिजली, तूर निजलीअकोला : अमरावती विभागात एकूण १८५ लहान-मोठ्या जनावरांचा मृत्यू व ५३ घरांची पडझड झाली आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याला अतिवृष्टीने झोडपून काढले. रविवारी मध्यरात्रीपासून मेघगर्जना, विजांच्या कडकडासह रात्रभर पाऊस झाला. पूर्व विदर्भात मात्र अपवाद वगळता तुरळक पावसाची हजेरी आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसामुळे नुकसान आहे. संत्र्याला झटका, तुरीला फटका हा पाऊस हरभऱ्यासाठी पोषक ठरत असला तरी वेचणीला आलेला कापूस, तूर व संत्रा पिकांचे नुकसान झाले आहे.
पुणे - भोर, आंबेगावमध्ये भाताचे नुकसानपुणे : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरू असून खेड, जुन्नर, आंबेगाव, भोर या चार तालुक्यांमध्ये पिकांना फटका बसला असून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.भोर आणि आंबेगाव तालुक्यात भाताची कापणी सुरू आहे. द्राक्षे, डाळिंब, धने, मेथी, टोमॅटो, कांदा रोपे, मिरची, पालेभाज्या, गहू, कांदा, हरभरा, पपई, मका, फ्लॉवर, कोबी अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.खान्देशात वीज पडून दोघांचा मृत्यूजळगाव/नाशिक : खान्देशातील जळगाव, नंदुबार धुळे जिल्ह्यात रविवारी रात्रभर जोरदार बरसल्यानंतर बेमोसमी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान झाले तिन्ही जिल्ह्यांत २८ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात वीज पडून दोन शेतकऱ्यांसह एका बैलाचा मृत्यू झाला. मका झोपला, कांदा काळा पडलाअहमदनगर जिल्ह्यात पावसामुळे शेतात असलेला मका झोपला, लाल कांद्याचेही नुकसान झाले. आठ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने टोकडे गावात वीज पडून बैल ठार झाल्याची घटना घडली