मुंबई: मालाड येथील आक्सा बीचवर पोहण्यासाठी आलेल्या पाच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपैकी दोघा जणांचा बुडून मृत्यू झाला असून बेपत्ता असलेल्या एकाचा शोध सुरु आहे. गेल्या मार्चपासून आक्सा बीचवर ही बुडण्याची पाचवी घटना असल्याने या बीचच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या बीचची ओळख आता ‘हादसा’ बीच अशी झाली आहे. १९९९ पासून आजवर येथे ८० जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेचे निवृत्त जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांनी दिली.दुपारी साडेतीनच्या सुमारास पाचपैकी चार महाविद्यालयीन विद्यार्थी आक्सा बीचवर गजिबो हॉटेलपासून एक किमी अंतरावर उतरले. यात दोन मुलींचा समावेश होता. यातील राहुल विश्वकर्मा हा त्याच्या पायाला लागल्याने किनाऱ्यावरच मित्रांचे कपडे सांभाळत थांबला होता, अशी माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक भास्कर सावंत यांनी दिली. आपले मित्र बुडत असल्याचे लक्षात येताच राहुल विश्वकर्माने बचावबचाव अशी ओरड सुरू केली. त्याचा आवाज ऐकून येथे तैनात असलेले जीवरक्षक आणि एफआरटी जवान पाण्यात उतरले. त्यांनी तिघांना पाण्याबाहेर काढले. मात्र तोपर्यंत यातील दीपशिखा गुप्ता (२०) रा. विरार, हेमंत शर्मा (२२) रा. कलिना यांचा मृत्यू झाला होता. शेखर गायकवाड (२२) रा. कलिना हा तरुण बेपत्ता असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधिकारी आत्माराम मिश्रा यांनी दिली. या दुर्घटनेत वाचलेल्या मरोळच्या मोनिका फर्नांडीस (२१) हिला वाचवण्यात जीवरक्षक मोहन एरंडे, प्रीतम कोळी, समीर कोळी यांना यश आले. हमला येथील रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिच्या जीवाचा धोका टळला आहे. (प्रतिनिधी)
आक्सा बीचवर दोघे बुडाले!
By admin | Published: May 12, 2015 2:54 AM