- डिप्पी वांकाणी, मुंबई
मालवणी येथून गतवर्षी आॅक्टोबरमध्ये अफगाणिस्तानात पळालेला अयाज सुल्तान आता महाराष्ट्र एटीएसच्या तपासाच्या कक्षेच्याही बाहेर गेला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एसटीएस त्याच्यावर मार्चपर्यंत पाळत ठेवून होते. पण, एक महिन्याच्या दौरा-ए-आम या ट्रेनिंगनंतर तो सिरियात पोहोचला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अयाज सुल्तान हा प्रथम मुंबईहून दिल्लीला गेला. नंतर दिल्लीहून विमानाने काबुलला गेला. अफगाणिस्तानच्या डोंगराळ भागात त्याला शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यात आले. अयाजनेच मालवणीच्या काही मित्रांना ही माहिती दिली. अतिरेकी संघटनात सहभागी होण्यासाठी अयाज या मित्रांना भडकावत होता. प्रशिक्षणानंतर अन्य काही लोकांसह त्याला सिरियात पाठविण्यात आले, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. अयाजने आपला फेसबुकचा आयडी बदलला होता आणि तो चॅटिंगही करत होता. तोपर्यंत आम्ही त्याच्यावर पाळत ठेवून होते. पण, आता तो कुठे आहे? काय करत आहे? हे आम्ही सांगू शकत नाही. कारण, त्याचा संपर्क तुटला आहे. प्रशिक्षण दिले गेले असले तरी त्याला युद्धात सहभागासाठी पाठविण्यात आलेले नाही, असेही एटीएसच्या सूत्रांनी सांगितले. तथापि, गुप्तचर विभागाकडे याबाबत काही नवीन माहिती असू शकते. हा तरुण कॉल सेंटरमध्ये काम करत होता. मागील वर्षी ३० आॅक्टोबरला तो घरातून निघून गेला. नूर मोहंमद, वाजीद शेख आणि मोहसीन शेख या तीन तरुणांच्याही तो संपर्कात होता. त्यांना घेऊन इसिसमध्ये सहभागी होण्याचा त्याचा डाव होता. यापैकी मोहसीनला अटक केली. वाजिद आणि नूर यांना एटीएस या प्रकरणात साक्षीदार बनवू पाहत आहे. अयाजने फेसबुकवर तीन आयडी बदलत मुंबईच्या मित्रांना इसिसचे व्हिडीओ पाठविले. अयाज चॅटिंगसाठी ट्रिलियन अॅप वापरत होता. मार्चपर्यंत एटीएस त्याच्यावर पाळत ठेवून होते. त्यानंतर तो संपर्काच्या बाहेर गेला. अयाजचा म्होरक्या यूसूफने त्याच्यावर आंतरराष्ट्रीय जबाबदारी सोपविली होती. चार तरुणांपैकी फक्त अयाजकडे पासपोर्ट होता.