Jitendra Awhad News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम यांच्यासंदर्भात केलेल्या विधानाचे पडसाद उमटत आहेत. भाजपासह अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाडांवर जोरदार हल्लाबोल केला. आंदोलने केली. तसेच जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. यातच आता अयोध्या नगरीतून जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावर प्रतिक्रिया आली आहे.
राम जन्मभूमीतील महंत आचार्य सत्येंद्र दास यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांचे विधान पूर्णपणे चुकीचे आहे. राम ज्यावेळी वनवासाला गेले होते. त्यावेळी त्यांनी कंदमुळे आणि फळ खाल्ली हेच शास्त्रामध्ये लिहिले आहे. शास्त्रानुसार तेच प्रमाण आहे, असे आचार्य सत्तेंद्र दास यांनी म्हटले आहे. तसेच महंत सुधार दास यांनीही यावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाडांवर सडकून टीका केली आहे.
भक्तिमय वातावरणात राक्षसांचा जीव गुदमरतो
शरद पवार यांच्यासमवेत त्यांच्या व्यासपीठावर वारंवार हिंदू देवतांचे अपमान केले जातात. मागे जयंत पाटील यांनीही अशा प्रकारचे विधान केले होते. असे प्रकार शरद पवार यांच्याकडून ठरवून केले जात आहेत का, जाणीवपूर्वक हिंदू धर्मावर बोलले जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचाच एक भाग म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी असे विधान केले. याविरोधात पंचवटी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करणार आहोत, असे महंत सुधीर दास यांनी सांगितले. राम मंदिराच्या निमित्ताने संपूर्ण देशात भक्तिमय वातावरण आहे. या भक्तिमय वातावरणात राक्षसांचा जीव गुदमरतो. त्याचाच परिणाम म्हणून जितेंद्र आव्हाड यांचा जीव गुदमरू लागला आणि असे विधान केले. श्रीरामांनी पंचवटीत १४ हजार राक्षस मारले होते. त्यातीलच काही यांच्यासारखे परत जन्माला आले असे वाटते, या शब्दांत जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला.
दरम्यान, राम आपला आहे, तो बहुजनांचा आहे. राम शिकार करून मांसाहार करत होता. तुम्ही आम्हाला शाकाहारी बनवायला निघाला आहात. मात्र आम्ही रामाचा आदर्श मानतो आणि मांसाहारी अन्न खातो. १४ वर्ष वनवासात राहणारा माणूस शाकाहारी अन्न कुठे शोधणार, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केले. जितेंद्र आव्हाड यांनी या विधानाबाबत पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. यावेळी काही पुरावे दाखवत कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.