- मोसीन शेख
मुंबई : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावरील सर्वोच्च न्यायालयातील ऐतिहासिक खटल्याचा निकाल आज लागला. या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमळा पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने राबवलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अयोध्या प्रकरणाच्या निकालाचे स्वागत म्हणून तेरखेडा गावातील हिंदू-मुस्लीम समाजातील बांधवांनी गावात चक्क गोड जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता.
अयोध्या प्रकरणाचा निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या निकालाकडे लागले होते. दुसरीकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी पोलिसांकडून घेण्यात येत आहे. हिंदू आणि मुस्लीम बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याला सर्वत्र प्रतिसाद सुद्धा मिळत आहे.
दरम्यान तेरखेडा येथील गावकऱ्यांनी एक पाऊल पुढे टाकत आदर्श घालून देण्याचे काम केले आहे. येरमळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक पंडीत सोनवणे आणि तेरखेडा गावातील बिभीषण खामकर यांच्या पुढाकाराने अयोध्या प्रकरणाच्या कालाचे स्वागत म्हणून तेरखेडा गावातील हिंदू-मुस्लीम समाजातील लोकांनी गावात गोड जेवणाचा कार्यक्रम ठेवला. विशेष म्हणजे गावातील सर्वच समाजातील लोकांनी यात सहभाग घेत न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले.
एक हजारपेक्षा अधिक गावकऱ्यांनी जेवणाचा आनंद घेतला. न्यायालयाचा निकाल काही असला तरीही तो आपल्याला मान्य असून, नेहमीप्रमाणे गावातील लोकं एकजूटीने सोबत राहतील. असे सुद्धा यावेळी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे या गावाने एक वेगळा आदर्श राज्यासमोर ठेवला असल्याचे बोलले जात आहे.
पोलीस अधीक्षक राज तिलक यांच्या मार्गदर्शनाखाली व तेरखेडा येथील गावकऱ्यांच्या सहकार्याने एक चांगला संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले होते. त्याला गावकऱ्यांनी देखील चांगला प्रतिसाद देऊन सर्वांपुढे एक आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला. - पंडीत सोनवणे (सहायक पोलीस निरीक्षक)