पुणे - प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांचे आज निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात तब्येत बिघडल्याने त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरू असतानाच आज त्यांची प्राणज्योत मालवली. बालाजी तांबे यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. डॉ. बालाजी तांबे यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (Ayurvedacharya Dr. Balaji Tambe passed away)डॉ. तांबे यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा अनेक वर्षे प्रचार प्रसार केला होता. आयुर्वेदिक औषधोपचारांबाबत ते विविध माध्यमांतून प्रवोधक करत होते. तसेच नवी पिढी सुदृढ जन्माला यावी म्हणून त्यांनी गर्भसंस्कार नावाच्या पुस्तकाचे लेखन केले होते. त्यांच्या या पुस्तकाचे विविध भाषांमधून भाषांतर करण्यात आले होते.
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहिली श्रद्धांजली“आयुर्वेदाचार्य श्री. बालाजी तांबे यांनी अध्यात्म, आयुर्वेद, योगोपचार, संगीतोपचारासारख्या पारंपरिक भारतीय उपचारपद्धतींचं पुनर्जीवन केलं. आयुर्वेद, योगोपचारांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किर्ती, लोकप्रियता मिळवून दिली. आयुर्वेदाचं महत्वं घराघरात पोहचवलं. स्वयंपाकघरातल्या वस्तूंचे आयुर्वेदिक गूण गृहिणींना समजावून सांगितले. आयुर्वेदाच्या माध्यमातून निरोगी, सुदृढ, आनंदी समाज निर्माण करण्याचं फार मोठं काम त्यांनी केलं. श्री. बालाजी तांबे यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय क्षेत्रातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्वं हरपलं आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांच्या कार्याचं स्मरण करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली.