मुंबई : गेल्या ६० वर्षांत अनेक बदल शीव येथील आयुर्वेदिक महाविद्यालयाने पाहिले आहेत. नवीन सुविधा आल्या आहेत, पण महाविद्यालयाने आजही रुग्णसेवेची वैभवशाली परंपरा सोडलेली नाही. हे वैभव पैशांचे नाही, तर इथल्या संस्काराचे आहे. महाविद्यालयाच्या कमानीतून पहिले पाऊल टाकणारा विद्यार्थी थोडा घाबरलेला असतो. पण, महाविद्यालय सोडून जाताना वैविध्यपूर्ण अनुभवाची शिदोरी घेऊन बाहेर पडतो, असे मत आयुर्विद्या प्रसारक मंडळाचे कोषाध्यक्ष वैद्य श्याम नाबर यांनी व्यक्त केले.आयुर्विद्या प्रसारक मंडळ संचालित आयुर्वेद महाविद्यालय आणि शेठ रणछोडदास वरजीवनदास आयुर्वेदीय रुग्णालय सेवाभावी वृत्तीने गेली ६० वर्षे कार्यरत आहे. या महाविद्यालयाचा षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा रविवार, २२ फेब्रुवारी रोजी माटुंग्याच्या यशवंत नाट्य मंदिरात रंगला. या कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष डॉ. रणजीत पुराणिक यांच्या हस्ते हीरक महोत्सवी वर्षानिमित्त महाविद्यालयाचा प्रवास दर्शन घडवणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. शेकडो आजी - माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. या वेळी बोलताना मंडळाचे अध्यक्ष डॉ. रणजीत पुराणिक यांनी महाविद्यालयात अनेक सुधारणा करायच्या आहेत, अशी इच्छा व्यक्त केली. अडीच वर्षांपूर्वी कार्यभार हाती घेतला तेव्हापासून लहान लहान ध्येय पूर्ण करण्याकडे लक्ष दिल्याने जे काही काम झाले आहे, ते करणे शक्य झाले. महाविद्यालय आणि रुग्णालयात अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रत्येक विभागासाठी आणायचे आहे. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवायची आहे. रुग्णालयात शेकडो रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे, तीच क्षमता वापरात आणायची आहे. महाविद्यालयातील विद्यार्थी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी क्षमता वाढविण्यावर आगामी काळात भर असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. १९५४ साली महाविद्यालयात असलेल्या काही विद्यार्थ्यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. (प्रतिनिधी)
आयुर्वेदाचा सहा दशकांचा संपन्न वारसा
By admin | Published: February 23, 2015 5:07 AM