नाशिक : ‘आयुष्मान भारत’ या सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या योजनेबाबतही यंत्रणेकडून योग्य प्रकारे कार्यवाही करण्यात येत नसल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. जिल्ह्यात सुमारे २३ लाख लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत अवघ्या ७ लाख लाभार्थ्यांपर्यंतच योजना पोहोचली आहे.
जिल्ह्यातील एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहता कामा नये, अशी तंबी देत केंद्रीय राज्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीचे आयोजन शनिवारी (दि. १६) जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. नियोजन भवनात सलग तीन तास चाललेल्या बैठकीत जिल्ह्याच्या आरोग्यस्थितीचा आढावा घेत पवार यांनी अधिकाऱ्यांना सर्व योजनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. या बैठकीस खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, मालेगाव महानगरपालिका प्रशासक भालचंद्र गोसावी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरकर समितीचे अशासकीय सदस्य यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात ‘आयुष्मान भव’ मोहीम सुरू होते आहे. २ ऑक्टोबरपर्यंत होणाऱ्या सेवा पंधरवड्यात विविध आरोग्यविषयक कार्यक्रम व मेळावे घेण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत ‘आभा कार्ड’चे जिल्ह्यात आतापर्यंत ११ लाख वितरण झाले आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये आयुष्मान भव मोहिमेंतर्गत दर शनिवारी मेळाव्याचे आयोजन होणार आहे.
जिल्ह्यातही विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ उद्यापासून जिल्ह्यात विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नाशिकमध्ये हा कार्यक्रम साजरा होत आहे.विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून देशातील १३ हजार कोटींच्या पॅकेजचा लाभ वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून हस्तकौशल्याने वस्तू बनविणारे कारागीर व शिल्पकारांना मिळणार आहे.